नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण नाशिककरांनी मंगळवारी (दि. ९) उत्साहात साजरा केला. घराेघरी चैतन्य व मांगल्याची गुढी उभारताना आनंदी तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. शहर व परिसरातून स्वागतयात्रा काढत पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. पाडवा व नूतन वर्षाचे औचित्य साधत नागरिकांनी सहकुटुंब शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली.
साडेतीन मुहूर्तांपेकी एक प्रमुख असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने अवघ्या नाशिकनगरीत उत्साह पाहायला मिळाला. आनंदपर्वावर शहरवासीयांनी वेळूच्या काठीवर रेशमी वस्त्र, कडुलिंबाचा पाला तसेच साखरेचे हारकडे बांधून मांगल्याची गुढी उभारली. सहकुटुंब गुढीची पूजा करून श्रीखंड-पुरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. पाडव्याच्या मुहूर्तावर रविवार कारंजा येथील श्री चांदीच्या गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला एक हजार १०० किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. तसेच नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी श्री काळाराम मंदिर, भगवान कपालेश्वर, नवशा गणपती यासह शहर-परिसरातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले.
जुने नाशिक, पंचवटीसह शहराच्या सहाही विभागांतून सकाळी सात वाजता स्वागतयात्रा निघाल्या. यावेळी नऊवारी साडी, नाकात नथ व विविध आभूषणे परिधान करून महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. तर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या पुरुषांची संख्या लक्षणीय होती. याप्रसंगी महिला तसेच बालकांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच पारंपरिक ढोलच्या तालावर ठेका धरत नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत केले.
पाडव्याच्या शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नूतन वर्षानिमित्ताने नाशिककरांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी सहकुटुंब एकत्रित येत पाडवा साजरा करताना गोडाधोडाचा आस्वाद घेण्यात आला. तसेच दूरच्या आप्तस्वकीय, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना यावेळी उत्तम व दीर्घायुष्यासाठी मनोकामना करण्यात आली.
शोभायात्रांनी वेधले लक्ष
-शहराच्या सहाही विभागांच शोभायात्रांचे आयोजन
-शंखनादाने नूतन वर्षाचे उत्साहात स्वागत
-ढोलताशांच्या गजरात पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण
-चिमकुल्यांच्या लाठाकाठ्या व तलावरबाजीने वेधले लक्ष
The post गुढीपाडवा : शहरात स्वागतयात्रांनी नूतन वर्षाचे स्वागत; मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन appeared first on पुढारी.