नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निवडणूक कुठलीही असो, राजकीय पक्ष अन् उमेदवारासाठी ती एखाद्या सोहळ्याप्रमाणे असते. लग्न सोहळ्यात जशी वर्दळ असते, तशीच वर्दळ उमेदवाराच्या घरी, पक्ष कार्यालयात अन् सोबत बघावयास मिळत असते. दारात मंडप, कार्यकर्ते, वाजंत्री, प्रचाररथ अशी तयारी करून उमेदवाराला मतदानाच्या दिवसापर्यंत वावरावे लागते. सध्या महाविकास आघाडी, महायुती व वंचितच्या उमेदवाराबाबत असे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र, मनसेचा उमेदवार रिंगणात नसतानाही मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर टाकलेला भलामोठा मंडप नाशिककरांचे लक्ष वेधून घेत असून, यावरून सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी देखील युतीधर्म पाळण्यासाठी कंबर कसली आहे. तत्पूर्वी आपण महायुतीचे घटक आहोत ही बाब कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर मोठा मंडप टाकण्यात आला आहे. मंडपावर दोन्ही बाजूने मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत. तर या दोन झेंड्यांच्या मधोमध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना, रासप आणि रिपाइ आठवले गट या पक्षांचे झेंडे लावले आहेत. तसेच मडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला राज ठाकरे यांची छबी असलेले पोस्टर लावण्यात आले असून, त्यावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा फोटो झळकत आहे. मनसे कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या उमेदवाराचे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी बैठका घेतल्या जात असून, प्रचाराचे नियोजन केले जात आहे. आम्ही महायुतीचा घटक असल्याने, ही निवडणूक मनसेची असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी मंडप टाकण्यात आला आहे. – सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे.
हेही वाचा –