चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा

चेहडी शाळा pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चेहडी परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ च्या आवारात चक्क विनापरवाना तलाठी कार्यालयाचे बांधकाम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाळेच्या आवारात ग्रामस्थांनी आधीच मंदिर बांधले आहे. त्यात आता तलाठी कार्यालयाचीही भर पडणार असल्याने जिल्हाधिकारी साहेब, सांगा आम्ही खेळायचे कुठे, असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखाने याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता, ही जागा सरकारी असून, नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीने बांधकाम केले जात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने थेट आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे तक्रार केली आहे.

महापालिका हद्दीत कोणतेही बांधकाम करावयाचे असल्यास त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी आर्किटेक्टच्या माध्यमातून पालिकेकडे रीतसर ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागतो. त्यानंतर नगररचना विभागाकडून त्याची पडताळणी, कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बांधकामाला सशुल्क परवानगी दिली जाते. शासकीय जागेवर बांधकाम करायचे असल्यास त्यासाठीदेखील नगररचना विभागाची परवानगी आवश्यक असते. परंतु, नाशिक उपविभागीय कार्यालयाने बांधकामांसाठी नगररचना विभागाची कोणतीही परवानगी न घेता, चक्क पालिकेच्या शाळेतच तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू केले आहे. ठेकेदाराने मुख्याध्यापकांनाही न कळवता या ठिकाणी तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार केली.

जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा
मुख्याध्यापकाने याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता, ठेकेदाराने सरकारी जागा असल्याचे सांगत, तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनीच परवानगी दिली असल्याने पालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे मुख्याध्यपकांनी तसेच केंद्रप्रमुखांनी याबाबत आयुक्त डॉ. अशोक करंजकर आणि शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भातील तक्रार आल्यानंतर आयुक्तांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

माजी नगरसेवकाचा दबाव
या जागेबाबत संबंधित मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखाने आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर एका माजी नगरसेवकाने या ठिकाणी तलाठी कार्यालयाला विरोध करू नका यासाठी मुख्याध्यापकावरच दबाव टाकण्याचे काम सुरू केल्याचे समजते. महापालिकेचे विश्वस्त या नात्याने माजी नगरसेवकाने महापालिकेची बाजू घेणे अपेक्षित असताना उलट दबाव आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुलांना शाळेत खेळासाठी छोटसे मैदान आहे. त्याच मैदानात महापालिकेची परवानगी न घेता, तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. – बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा

हेही वाचा:

The post चेहडीमध्ये विनापरवाना बांधकाम हडपतेय मुलांच्या खेळाची जागा appeared first on पुढारी.