नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल

नाशिक जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले. त्यानुसार नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातही सोमवारी (दि.१०) सकाळी मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पाहणी करीत उपचारासंबंधी मार्गदर्शन केले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देतानाच, शासकीय रुग्णालयांमध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर सज्जता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. डॉ. भारती पवार यांनी सोमवारी सकाळी कोविडबाबत मॉकड्रिल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या कोरोना चाचणीपासून ते कोरोना वॉर्डात रुग्ण दाखल होईपर्यंतची प्रक्रियेची उजळणी करण्यात आली. या सर्व प्रक्रियेदरम्यान किती वेळ लागतो, रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांची कार्यपद्धती व औषधोपचाराचा साठा याचीही पाहणी करण्यात आली.

नवीन सिंहस्थ कुंभमेळा इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या दुसऱ्या मजल्यावरील मॉड्युल आयसीयू, तिसऱ्या मजल्यावरील कोरोनाबाधित रुग्ण वॉर्ड, तर चौथ्या मजल्यावर वॉर्डाचीही पाहणीही ना. डॉ. पवार यांनी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधाडिया, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, डॉ. रोहन बोरसे, मनपाचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे आदी अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल करण्यात आले. यामुळे रुग्णालयातील सज्जता दिसून आली. तसेच, रुग्णालयातील कामकाजाचाही आढावा घेतला. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी विनामास्क जाऊ नये.

– डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य मंत्री

हेही वाचा : 

The post नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा रुग्णालयात मॉकड्रिल appeared first on पुढारी.