नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग

गादी दुकान, गोदामास भीषण आग,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वडाळा गाव परिसरातील खोडेनगर येथील अनसूया कॉलनीलगत असलेल्या महाराष्ट्र गादी भांडार दुकान व गोदामास भीषण आग लागली. सोमवारी (दि.१०) सायंकाळी चारच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दहा बंबांमार्फत पाण्याचा मारा करून आग शमवण्याचे प्रयत्न केले. मात्र, रात्री ८.१५ पर्यंत आगीवर नियंत्रण आले नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.

अनसूया कॉलनीलगत महाराष्ट्र गादी भांडार नावाचे दुकान असून, त्याला लागूनच गोदाम आहे. या ठिकाणी गादी, कापूस मोठ्या प्रमाणात साठवलेला आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास आग लागल्याचे समजले. जोरदार वारा आणि कापूस असल्याने आगीने क्षणात राैद्ररूप धारण केले. याची माहिती अग्निशमन दलास मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रासह इतर विभागीय केंद्रांवरून पाण्याचे बंब घटनास्थळावर रवाना करण्यात आले. आग पसरल्याने दहा बंबांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करण्यात येत होता. मात्र आग विझत नव्हती. त्यामुळे फेऱ्या मारून पाण्याचे बंब पुन्हा मागवण्यात येत होते.

रात्री सव्वा आठपर्यंत आग शमलेली नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी, मुंबईनाका पोलिस घटनास्थळी होते. आग लागल्याने परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ मागवत गर्दी दूर केली. मात्र त्यामुळे काही वेळ परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तुरळक पाऊस पडल्याने आगीवर नियंत्रण मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र वारा, कापूस, लाकूड, कपडे यामुळे आग पसरल्याचे पाहावयास मिळाले. आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीमुळे १ लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : गादी दुकान, गोदामास भीषण आग appeared first on पुढारी.