नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा

मुसळधार पाऊस

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यासह देवगाव परिसरात मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सुरू झालेल्या वादळी पावसाने रात्रभर झोडपून काढले. सात ते आठ दिवसांपासून विसावा घेतलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनाबरोबरच पावसाचेही पुनरागमन झाले असून, भातपिकांनी ही स्थिती पोषक ठरली आहे. विजांचा कडकडाट, वारा आणि पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित होऊन बत्ती गूल झाली. त्यामुळे देवगाव परिसरातील संपूर्ण गावे काळोखात गडप झाली.

मंगळवारी सकाळपासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण अधिक वाढून घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होत होती. एकीकडे गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त धावपळीत व्यस्त होते. दिवसभराच्या गर्मीमुळे पाऊस येण्याची शक्यता दाट होती. सायंकाळी चारपासून आकाशात ढगांनी दाटी करून ढगांच्या गर्जना सुरू झाल्या. रात्री नऊच्या दरम्यान प्रचंड वीज, वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार धारा तीन ते चारच्या आसपास कोसळत होत्या. परिणामी, वीजपुरवठा खंडित होऊन काळोख दाटला होता. देवगाव परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने बळीराजा आनंदित आहे. मात्र, गणेशोत्सवापासूनच पाऊस वळवावर गेल्यास चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. अद्यापही दोन नक्षत्रांचा पाऊस शिल्लक असून, आताच पावसाने ओढ दिली, तर शेतीच्या उत्पादकतेत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. ३० ऑगस्ट रोजी सूर्याने पूर्वा नक्षत्रात प्रवेश केला आहे. पुढील हत्ती व उत्तरा ही नक्षत्रे शिल्लक आहेत. वळवाचा पाऊस म्हणजे परतीचा पाऊस असतो. सप्टेंबर प्रारंभीच पाऊस गायब झाला, तर रोपे तयार होण्यासाठी किमान पावसाची आवश्यकता असते. ती मिळाली नाही तर रोपांसाठी संकट निर्माण होऊ शकते.

रात्रभर वीज पावसाचा खेळ…

सात ते आठ दिवसांनी जोरदार कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्रभर विजांचा कडकडाट सुरू होता. रात्रभर कडकडणाऱ्या व चमचमणाऱ्या विजांचा खेळ सुरू होता. त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले होते.

क्रिकेट सामन्यावर पावसाचे विरजण…

मंगळवारी सायंकाळी ७.३० आशिया चषकतील भारताचा दुसरा सामना हाँगकाँग विरुद्ध सुरू होता. मात्र, अचानक सुरू झालेल्या विजेच्या कडकडाटासह पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने क्रिकेटप्रेमींना मंगळवारच्या सामन्यावर पाणी सोडावे लागल्यामुळे नाराज झाले.

हेही वाचा:

The post नाशिक : त्र्यंबक तालुक्याला रात्रभर वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.