नाशिक : कोरोना वाढतोय, महापालिकेकडून ८५० ऑक्सिजन बेड्सची तयारी

ऑक्सिजन बेडस

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात ६५०, तर द्वारका कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५० ऑक्सिजन बेडसची तयारी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात सातत्याने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्याचबरोबर सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचेही प्रमाण वाढत असल्याने, कोरोनाचा धोका वाढत आहे. चाचण्या वाढविल्यास रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. अशात महापालिकेच्या आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहर व परिसरात रुग्णांची संख्या जेमतेम असली तरी, ती केव्हाही वाढू शकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेने ऑक्सिजन बेडसची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे.

बिटको रुग्णालयात तब्बल ६५० ऑक्सिजन बेडस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५० बेडसची व्यवस्था केली जाणार आहे. रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास गैरसोय होऊ नये यासाठी प्राधान्याने बेड उपलब्ध करून दिल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

३५ रुग्ण होमक्वॉरंटाइन

सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे ३६ रुग्ण असून, त्यातील ३५ रुग्णांना होमक्वॉरंटाइन करण्यात आले आहे. उर्वरित एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. बाधितांनी होमक्वाॅरंटाइन होणे गरजेचे आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने बाधितांकडून संसर्ग पसरू नये याची खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहनही महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध

लशी संपल्याने, महापालिकेने लसीकरण मोहीम बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, तत्काळ लस उपलब्ध केली जावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात लशी उपलब्ध असल्याने, नागरिक लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांमध्ये रांगा लावत आहेत. लवकरच राज्य शासनाकडून लशी उपलब्ध करून दिल्या जातील.

हेही वाचा : 

The post नाशिक : कोरोना वाढतोय, महापालिकेकडून ८५० ऑक्सिजन बेड्सची तयारी appeared first on पुढारी.