नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर सापडल्या अकरा गुहा

रामशेज किल्ला,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गशोध अभ्यास मोहिमेत रामशेजच्या नैसर्गिक कातीव अभेद्य कड्याच्या पोटात एकूण ११ गुहा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर चाेहोबाजूने अतिशय दुर्मीळ वनस्पती, वनौषधी वृक्ष व विविध पक्षी आढळून आले आहेत. कडाक्याच्या उन्हात यावेळी दुर्गसंवर्धकांनी तीन गट तयार करून दिवसभरात ही मोहीम पूर्ण केली. यापुढेही या मोहिमेचा दुसरा टप्पा होईल, असे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.

अजिंक्य दुर्ग रामशेजच्या २३ वर्षे अभ्यासपूर्ण पद्धत्तीने अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमा करून येथील झुडपात मातील नष्ट होणारा, ऐतिहासिक ठेवा, विविध जलस्रोत, दुर्मीळ झाडे, दुर्गजागृतीसाठी अविरतपणे राबत आहे. यावेळी रविवारच्या मोहिमेत रामशेजच्या चाेहोबाजूने ज्ञात-अज्ञात ऐतिहासिक, नैसर्गिक पाऊलखुणा व दुर्मीळ जैवविविधतेची शोध अभ्यास मोहीम झाली, या मोहिमेत एक गट रामशेजच्या कपारींचा सुरक्षित शोध घेत, तर दुसरा मध्यभागी जलस्रोत शोध, तिसरा चाेहोबाजूने दुर्मीळ वनस्पतींचा शोध घेत होते. त्यात रामशेजच्या कपारीत ११ गुहा आढळल्या. मध्यभागी विविध घळीत कातीव असंख्य दगड, गोलाकार दगडी तर किल्ल्याच्या चाेहोबाजूने पिंपळ, बाभूळ, काटेसाबर, भोकर, दैवस, अडुळसा, गुर्तुली, शेकडो वर्षे जुने उंबराचे झाड, चिंच, चिलार, अडुळसा, कोरफड, साबर, हिवर तसेच पश्चिम पोटात वनविभागाने लावलेली बांबू व सागाची काही झाडे आढळली. येथील मोर, दुर्मीळ लाहुरी पक्षी, गुहेत असणारा ससाणा विस्थापित होत आहे. याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. रामशेज युद्धात वापरलेले दगड गोटे अधिक प्रमाणात किल्ल्याच्या चाेहोबाजूने दिसतात, तर किल्ल्यावर कातलेली बांधकामाचे असंख्य दगड घळीत पडलेले आहेत. मोहिमेच्या अखेरीस येत्या १४ मे रोजी रामशेजच्या माथ्यावर गोमुखी द्वारात होणाऱ्या छत्रपती शंभुराजे जन्मोत्सव नियोजन बैठकीत विविध जबाबदारीचे प्रयोजन करण्यात आले.

यावेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या रामशेज दुर्ग अभ्यास शोधमोहिमेत संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, भूषण औटे, किरण दांडगे, पर्यावरण वृक्षअभ्यासक भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, मनोज अहिरे, दुर्गसंवर्धक हेमंत पाटील, वैभव मावळकर, राम पाटील, कार्तिक बोगावार उपस्थित होते.

रामशेजच्या माथ्यावर दोन दशके आम्ही शिवकार्य गडकोटच्या मोहिमेत राबतोय, मात्र रामशेजच्या अभेद्यतेच्या कातीव कड्यातील पोटात असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यात यश आले. एकूण ११ पुरातन, नैसर्गिक गुहा आढळल्या. त्यात सैनिक टेहळणीसाठी बसू शकतील व या ठिकाणी वन्यजीव ही आश्रयास असू शकतील अशा त्या गुहा आहेत.

– मनोज अहिरे, अभ्यासक

पाहा सापडलेल्या अकरा गुहा

रामशेज किल्ल्यावर सापडल्या अकरा गुहा,www.pudhari.news

हेही वाचा :

The post नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर सापडल्या अकरा गुहा appeared first on पुढारी.