छगन भुजबळ- सुभाष भामरे यांच्यात बंद दाराआड काय चर्चा?

छगन भुजबळ सुभाष भामरे

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – धुळे लोकसभा मतदार संघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे व महाविकास आघाडीच्या शोभा बच्छाव यांच्यात लढत होत आहे. दोनही उमेदवारांकडून आपल्या मतदारसंघात प्रचार व भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची डॉ. सुभाष भामरे यांनी भेट घेतली आहे. त्याच्यांत बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य हे तीन विधानसभा मतदार संघ येतात. या मतदार संघात भुजबळांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदार संघात ओबीसी मतदारही मोठा आहे. त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याकडे खेचन्याच्या दृष्टीने भामरेंना भुजबळांची मदत मिळेल असेही या भेटीमागील कारण सांगितले जात आहे.  सुभाष भामरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगावात त्यांच्या विरोधात बॅनर झळकले होते, त्यामुळे तीही नाराजी दूर करण्याचे भामरेंपुढे आव्हान आहे.

नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र, भुजबळांनी माघार घेतल्यानंतर वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाला गेली व हेमंत गोडसे यांचे नाव महायुतीने जाहीर केले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, डॅा. भारती पवार यांच्यासह अनेकांनी भुजबळांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर आज डॅा. भामरे यांनीही भुजबळांची भेट घेतली.  छगन भुजबळ हे ओबीसी नेते असल्याने भुजबळांच्या भेटींना महत्व आहे.

हेही वाचा –