जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन 

गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन-चार दिवस मागे-पुढे होतील परंतु, आम्हाला मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाला वेगळे वळण मिळायला नको, त्यामुळे या मुद्द्यावरून कोणी भांडू नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ, असा दावा करत मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. आम्ही त्यांना विनंती करू, त्यांनी मुंबईला जाण्यासंदर्भात फेरविचार करावा, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. (Maratha Reservation)

येत्या १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा संमेलनांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होत आहे. नियोजित सभास्थळ तपोवनातील साधुग्राम मैदानाची पाहणी करत सभेच्या तयारीचा आढावा मंत्री महाजन यांनी घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही अन्य कोणाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्रुटी दूर करून आरक्षण देऊ. पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी महाजन म्हणाले की, येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन असल्याने क्रीडा व युवा खात्यातर्फे युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव १६ जानेवारीपर्यंत चालेल. सुमारे आठ हजार विद्यार्थी सहभागी होतील. या अंतर्गत पाच दिवस विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, सांस्कृतिक, खाद्यमहोत्सव कार्यक्रम होईल. राज्याची संस्कृती दाखविण्याची संधी, स्पर्धा होतील, वक्तृत्व स्पर्धा, कथा-लेखन स्पर्धा असे उपक्रम होतील. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना महाजन म्हणाले की, एकीकडे धारावीच्या मुद्द्यावर मोर्चे काढले जातात आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे अदानी यांची भेट घेतात. ते माझे मित्र असल्याचे सांगतात. आता उद्धव ठाकरे यांनीच ठरवावे. ठाकरे यांना राममंदिर उद‌्घाटनाचे निमंत्रण मिळाले का हे माहीत नाही. परंतु त्यांच्याकडून जे राजकारण सुरू आहे. ते चांगले नाही. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण आहे. ठाकरे गट राष्ट्रीय पक्ष राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (Maratha Reservation)

राज ठाकरे यांचे स्वागत

भाजपसोबत खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी आहे. आम्ही सर्व मिळून लढणार आहोत. राज ठाकरे हे समविचारी आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येत असतील, तर कुणाला हरकत नसावी, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलताना महाजन यांनी दिली. राज ठाकरे सरकारवर टीका करत असतात. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, जिथे चुकत असेल, तिथे टीका केली पाहिजे. परंतु राज ठाकरे महायुतीत आले, तर आमची ताकद वाढेल. कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

खडसेंना चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत

राज्यात सर्वश्रुत असलेल्या एकनाथ खडसे व गिरीश महाजन वादाने आज टोक गाठले. राममंदिर आंदोलनावेळी गिरीश महाजन कोठे होते, असा सवाल खडसे यांनी केला होता. त्यावर बोलताना महाजन यांची सडकून टीका केली. खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांच्यावर मलाच इलाज करावा लागेल. त्यांच्याकडे चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत. गौण खनिजाचे उत्खनन केल्या प्रकरणी त्यांना १३७ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. २७ कोटी रुपये भोसरी जमीन प्रकरणात भरावे लागणार आहे. त्यामुळे ते भांबावले असून, त्यांना माझ्याशिवाय काही दिसत नाही. राममंदिर आंदोलनात मी जेलमध्ये गेलो. तेव्हाचा फोटो गाजला होता. हे त्यांनी माहीत आहे असे असतानाही फालतू प्रश्‍न विचारतात. खडसे यांची अवस्था वाईट आहे, अशी टीका महाजन यांनी केली.

नाशिकमधून निवडणुकीचे रणशिंग

नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रमाचे उद्घाटन व जाहीर सभा हे दोन स्वतंत्र कार्यक्रम असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेनिमित्त नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. गिरीश महाजन यांनी तसे संकेत दिले. विकसित भारत संकल्पना घेऊन सरकारची युवा धोरणे युवकांपर्यंत पोहोचविले जाणार असल्याचे ते म्हणाले. नाशिकला कार्यक्रम घेण्यासाठी आम्हीच आग्रह धरल्याचा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा :

The post जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन  appeared first on पुढारी.