नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात जलसमृद्ध अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या गाळ उपसा उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याचा प्रारंभ महिरावणी येथील लपा तलाव येथे शुक्रवारपासून (दि.३) सुरू करण्यात येत आहे. दुपारी ४.३० वाजता महिरावणी येथे याबाबतचा शुभारंभ सोहळा आयोजित केला असून त्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अरुण निकम उपस्थित राहणार आहेत.
धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती गाळामुळे खूपच बिकट असून, त्यातील गाळ न काढल्यास, नाशिककरांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या बाबीचा विचार करून समृद्ध नाशिक फाऊंडेशनच्यावतीने जिल्ह्यातील विविध धरणांमधील गाळ उपसा अभियान राबविले जात आहे. गेल्या १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूर धरणातील बॅक वॉटर परिसरात गाळ उपसा काम सुरू आहे. गेल्या १५ दिवसात काढण्यात आलेल्या गाळामुळे धरणाची पाणी क्षमता एक कोटी लीटरपेक्षा अधिक वाढली आहे. दरम्यान, आता या जलसमृद्ध अभियानाचा पुढचा टप्पा महिरावणीतील लपा तलाव येथे सुरू करण्यात येत आहे. तलावातील गाळ परिसरातील शेतकऱ्यांना विनामुल्य दिला जाणार आहे. ट्रॅक्टर किंवा टिप्परच्या माध्यमातून या गाळाची वाहतूक शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. हा गाळ शेतीसाठी अत्यंत सुपीक असून, शेतकऱ्यांनी शेती कसदार करण्यासाठी या गाळाचा वापर करण्याची गरज आहे. जेणेकरून शेतीची उत्पादनक्षमता वाढण्यात मदत होईल.
दरम्यान, या अभियानासाठी शहरातील व्यापारी, औद्योगिक, व्यावसायिक, बांधकाम संघटनांनी पुढाकार घेतला असून, भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे तांत्रिक पाठबळ लाभत आहे. दरम्यान, महिरावणी येथील गाळ उपसा उपक्रमात अधिकाधिक नाशिककरांनी सहभागी होवून शक्य ती मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा: