जलसाठा घटतोय! गंगापूर धरणाची जलपातळी खालावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महापालिकेकडून शहरात पाणीकपातीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा धरणांत नाशिककरांसाठी जेमतेम १,०९१ दशलक्ष घनफूट आरक्षित पाणीसाठा शिल्लक राहिला असून, तो ३१ जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी दररोज सुमारे २५ टक्के पाणीकपात करावी लागणार असल्याने नाशिककरांवरील पाणीकपात अटळ झाली आहे.

गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्याकरिता तब्बल ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणावर झाला. नाशिकसाठी ६,१०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असताना, महापालिकेच्या वाट्याला जेमतेम ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मिळू शकले. नाशिक शहरासाठी धरणांतून दररोज सरासरी १९.७५ दशलक्ष घनफूट अर्थात दररोज ५५६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. नाशिकसाठी उपलब्ध झालेल्या एकूण पाणी आरक्षणापैकी गंगापूर धरणात ८०० दशलक्ष घनफूट, तर दारणा व मुकणे धरणांत २९१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण सध्या शिल्लक आहे. हे पाणी दि. ३१ जुलैपर्यंत पुरवायचे झाल्यास दररोज ५५६ ऐवजी ४१२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागेल. त्यानुसार तब्बल १४४ दशलक्ष लिटर अर्थात दररोज २५ टक्के पाणीकपात करावी लागणार आहे. निर्णय घेण्यास जसजसा उशीर केला जाईल, तसतसा पाणीकपातीचा टक्का वाढणार आहे. लोकसभा निवडणुका असल्यामुळे पाणीकपातीच्या प्रस्तावावर निर्णय झाला नव्हता. आता मात्र मतदानाची प्रक्रिया पार पडल्यामुळे प्रशासन स्तरावर पाणीकपातीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे.

शहरासाठी पाण्याचे एकूण आरक्षण (दशलक्ष घनफुटांत)
– गंगापूर धरण- ३,८०७
– दारणा व मुकणे धरण- १,५०७
– एकूण आरक्षण- ५,३१४

शिल्लक पाणीआरक्षण (दलघफू)
– गंगापूर धरण- ८००
– दारणा व मुकणे- २९१

हेही वाचा: