जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे

हेमंत गोडसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शिवसेनेची जागा असली तरी या जागेवर भाजप, राष्ट्रवादीसह मनसेनी दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता बघावयास मिळत आहे. अशात खासदार हेमंत गोडसे यांनी ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी शेकडो वाहने घेऊन थेट ठाणे गाठत पक्षश्रेष्ठींसमोर शक्तीप्रदर्शन केले. रविवारी (दि.२४) शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार गोडसे ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीसाठी आग्रही मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतींमध्ये ज्या मोजक्याच जागांचा तिढा आहे, त्यात नाशिकचाही समावेश असून ही जागा कोणाच्या पारड्यात पडेल, याविषयी अद्यापही अस्पष्टता आहे. दरम्यान, या जागेेसाठी अगोदर भाजपने मागणी केली. शहरात भाजपचे तीन आमदार असून, महापालिकेत एकहाती भाजपची सत्ता होती. याशिवाय मतदारसंघात येणाऱ्या ग्रामीण भागातही भाजपची ताकद असल्याने, हा मतदार संघ भाजपला सोडला जावा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली गेली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही केले गेले. त्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जागेवर दावा केला. तसेच काही दिवसांपूर्वीच महायुतीत जवळपास सहभागी झालेल्या मनसेनी देखील नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला. नाशिक मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. अशात ही जागा नाशिकला सोडली जावी, अशी मागणी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीच महायुतीच्या नेत्यांकडे केली. भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटामध्ये मात्र कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. ही जागा हातून जाते की काय? या भितीतून खासदार गोडसे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाणे गाठत पक्षाचे नेते मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केली होती. तेव्हा भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलेली उमेदवारी ही अधिकृत नसल्याबाबत सावरासावर केली गेली.

तिसऱ्यांदा उमेदवारी?
नाशिक लाेकसभा मतदार संघ शिवसेनेलाच सोडला जाणार असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास खासदार गोडसेंना तिसऱ्यांदा नाशिक लाेकसभा मतदार संघातून उमेदवारी करण्याची संधी मिळेल. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी उमेदवारी करीत, विजयश्री खेचून आणली आहे.

नाशिक लाेकसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ आहे. मात्र, अशातही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून या जागेवर दावा केला जात आहे. आम्ही मात्र शांततेची भूमिका घेत होतो. परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने, ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे येणे आवश्यक होते. त्यानुसार ज्या कार्यकर्त्यांना सोबत यावसे वाटले ते आले. हे शक्तीप्रदर्शन नाही. ही जागा आम्हालाच मिळेल, याचा विश्वास आहे. – हेमंत गोडसे, खासदार.

हेही वाचा:

The post जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे appeared first on पुढारी.