जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे आवाहन

शिष्शवृत्ती pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे (Maha DBT) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीला प्रथम प्राधान्य देत ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे. (Pre-Matric Scholarship Scheme)

इयत्ता ९ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती इ. ५ वी ते ७ वी मध्ये आणि ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क (अनु. जाती) या सर्व शिष्यवृती योजनांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या https://prematric.mahait.org/Login/Login या संकेतस्थळावर मुख्याध्यापक यांनी लॉगिन करावे. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांकरिता अर्जाच्या नोंदणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी युजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass@१२३ टाइप करून लॉग इन करून शाळेचा नवीन पासवर्ड तयार करावा.

शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करताना त्यामध्ये शाळेची मुख्याध्यापकांची व लिपिकांची माहिती अद्ययावत करावी. विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी विद्यार्थ्याची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी. त्याचप्रमाणे योजनेची निवड करणे यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे, त्या योजनेकरिता अर्ज नोंदणी करावी, असे पाटील यांनी कळविले आहे. (Pre-Matric Scholarship Scheme)

हेही वाचा:

The post जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे आवाहन appeared first on पुढारी.