मित्रांनीच काढला काटा : पोलिसांनी आवळल्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या

काजळे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासगी सावकारीत दहशत निर्माण करणारा पंचवटीतील सराईत गुंड संदेश काजळे याचा मित्रांनीच जाळून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना मोखाडा पोलिसांच्या हद्दीत घडली असून, मद्यधुंद अवस्थेत असताना मारेकरी मित्रांनी त्याला मोखाड्याला नेऊन हत्या केली. मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. गुन्हे शाखा युनिट एकने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्वप्निल उन्हवणेला गुन्ह्यात वापरलेल्या कारसह २४ तासांत अटक केली.

संदेश चंद्रकांत काजळे (३५, रा. माताजी चाैक, विजयनगर, सिडकाे) असे मृत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी त्याच्यावर खंडणी, अवैध सावकारी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दमदाटी, ॲट्रॉसिटीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल हाेते. शुक्रवारी (दि.९) रात्री संदेश काजळे हा पंचवटीतील निमाणी बसस्थानकासमाेरील सूर्या हाॅस्पिटलच्या मागील पार्किंमध्ये आला होता. त्याचे संशयित मित्र नितीन उर्फ पप्पू चाैगुले (रा. ड्रीम कॅसलमागे, मखमलाबाद राेड), रणजित आहेर व स्वप्निल दिनेश उन्हवणे (२३, दाेघे रा. राजवाडा, पंचवटी), पवन भालेराव (रा. त्र्यंबकेश्वर राजवाडा) आणि इतरांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यानंतर संदेशला मारहाण करून त्याला कारमध्ये कोंबून त्याचे अपहरण करण्यात आले. संदेशचा चुलतभाऊ प्रीतेश काजळेला ही बाब समजल्यानंतर त्याने पंचवटी पोलिसांत पाच जणांविरुद्ध अपहरण केल्याची तक्रार दिली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, रविवारी (दि. ११) पहाटे माेखाडा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळेचा अर्धवट जळालेला मृतदेह पाेलिसांना आढळला. काजळेच्या अपहरणाच्या दाखल गुन्ह्याची माहिती व त्याचे वर्णन हुबेहुब काजळेशी जुळत असल्याने माेखाडा पाेलिसांनी शहर पाेलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी आणि गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास केला. तेव्हा युनिट एकला संशयित उन्हवणे हा ईकाे कारसह त्र्यंबक भागात असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेवरून पथकाने सापळा रचून उन्हवणेला अटक केली. उर्वरित चौघांचा शाेध सुरू आहे. या अपहरणसंदर्भात मृत काजळेचा चुलतभाऊ प्रीतेश काजळेच्या फिर्यादीनुसार पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर, खुनाचा प्रकार उघड झाल्याने याच अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

संशयित आरोपी डीजे ऑपरेटर
मृत संदेशने जानेवारी २०२० मध्ये वाढदिवसानिमित्त रविवार कारंजा येथील निखिल पवारच्या दरी – माताेरी येथील बाणगंगा फार्म हाउसवर सेलिब्रेशन पार्टी ठेवली हाेती. तेथे ओझर येथील दाेन डीजे ऑपरेटर डीजेवर गाणे वाजवित असताना रात्री 10 नंतर डीजे वाजविण्यास दाेघांनी बंदी असल्याचे सांगून नकार दिला हाेता. त्याचा राग आल्याने संदेश काजळे, त्याचा चुलतभाऊ संशयित प्रीतेश काजळे यांच्यासह संदेश वाघ, अभिषेक शिरसाट, रोहित डोळस, संदीप भवाळकर, प्रकाश वाघ, ओंकार मथुरे, भूषण सुर्वे, रवींद्र सूर्यवंशी यांनी संगनमताने डीजे ऑपरेटर तरुणांना बांधून ठेवत शाॅक दिला हाेता, तर हवेत गोळीबार करून या युवकांना मारहाण करून त्यांचे कपडे काढत त्यांच्या अंगावर थंड पाणी ओतले होते. गुप्तांगावर सिगारेटचे चटके व बॅटरी संचांनी विजेचा शॉक दिला हाेता. ये प्रकरण राज्यभरात गाजले होते. विविध संघटनांनी आक्रमक पावित्रा घेत काजळेवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्याला व इतरांना अटक झाली होती.

The post मित्रांनीच काढला काटा : पोलिसांनी आवळल्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या appeared first on पुढारी.