आमदार नितेश राणे : नाशिकमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

जनआक्रोश pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशभरात रेल्वे व सैन्य दलानंतर देशात तिसऱ्या क्रमांकाची जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशभरात दादागिरी सुरू असून, जमिनी लाटल्या जात आहेत. त्यामुळे हे प्रकार राेखण्यासाठी हिंदूंनी एकत्रित येणे गरजेचे आहे. जमीन मागायला येणाऱ्या वक्फला विरोध करताना त्यांच्या जमिनींवर बजरंगबलीची मंदिरे उभी करावी. राज्य व केंद्र सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चामधून दिला.

देशातून वक्फ कायदा-१९९५ रद्द करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा माेर्चा सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी आ. राणे, सुरेश चव्हाणके, काजल हिंदुस्तानी, भारतानंद सरस्वती आदी उपस्थित होते. आ. राणे यांनी संबोधित करताना जगातील इस्लामिक देशांमध्ये नसलेला वक्फ कायदा हा केवळ अन‌् केवळ भारतामध्ये लागू आहे. या वक्फ कायद्याच्या माध्यमामधून देशाला इस्लामिक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. परंतु, ९० टक्के हिंदू असलेल्या भारतात हे कदापिही आम्ही होऊ देणार नाही, अशी टीका राणे यांनी केली.

देशात केवळ भारतीय संविधान लागू असून, आम्हाला वक्फ कायदा मान्य नाही. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी राणे यांनी केली. तसेच यापुढे वक्फ बोर्डाला एकही जागा देणार नाही, असा निर्धार करावा. त्यासाठी हिंदूंनी पेटून उठत लढा उभारावा. तुमच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार आहे, असे राणे यांनी सांगितले. प्रारंभी बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. शालिमार, नेहरू गार्डन, एमजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा पोहोचला. यावेळी माेर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते.

गृहमंत्री फडणवीस आहेत
मुंबईच्या मीरा रोड येथील घटनेनंतर तेथे बुलडोझर चालविण्यात आला. राज्य व केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा, असा इशारा राणे यांनी दिला. लवकरच मालेगाव येथील किल्ला परिसर भागातील अतिक्रमणे काढण्यात येऊन तेथे पोलिस चाैकी उभारण्यात येणार आहे. मालेगावला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यन्वित केले जाणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

वाहतूक वळवली
मोर्चावेळी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर व्यासपीठ उभारण्यात आले. पहिल्या टप्प्यात पोलिसांनी अशोकस्तंभ ते सीबीएस असा एकेरी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सीबीएस येथून अशाेक स्तंभाकडे येणारी वाहने अन्य मार्गाने वळवली. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

The post आमदार नितेश राणे : नाशिकमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.