वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग

कोल्हापूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदार मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरसावले आहेत. अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आठ आमदारांनी यंदा शंभर टक्के निधी खर्च केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा ६० टक्क्यांच्या आसपास खर्च झाला आहे. फेब्रुवारीअखेरनंतर कोणत्याही क्षणी आचारसंंहिता लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी फायली मंजूर करून घेण्याकडे लोकप्रतिनिधींचा कल आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेतानाच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात असताना इच्छुकांनीही मतदारांच्या गाठीभेटीसह निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रंगत वाढू लागली असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा निवडणूक आचारसंहितेपूर्वी शंभर टक्के आमदार निधी खर्च करण्याकडे कल पाहायला मिळतो आहे.

चालू वर्षी मतदारसंघातील निधी खर्चाच्या मर्यादेनुसार जिल्हा नियोजन समितीकडे कामांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी लगबग सुरू आहे. विशेष म्हणजे मंत्री भुजबळ यांनी ४ कोटी ८१ लाख १९ हजार रुपयांची कामे मंजूर करून घेतली आहेत. झिरवाळ यांनी मतदारसंघासाठी १०० टक्के म्हणजे ४ कोटी ९६ हजार रुपयांच्या कामांना मान्यता घेतली आहे. याशिवाय सहा आमदारांनी त्यांचा निधी पूर्णपणे खर्च केला आहे. याव्यतिरिक्त कळवणचे नितीन पवार, नांदगावचे सुहास कांदे व नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे यांनी ९१ टक्के, तर मालेगावचे मुफती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक यांचा ८३ टक्के व चांदवडचे डॉ. राहुल आहेर यांचा ८० टक्के निधी खर्च झाला आहे. देवळालीच्या सराेज अहिरे यांनी ५० टक्क्यांच्या आसपास निधी खर्च केला असून, या यादीत निफाडचे दिलीप बनकर आणि नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे या तळाला आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचा कार्यक्रम घोषित केला जाऊ शकतो. एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढील ३ महिने कामांचे प्रस्ताव थंड बस्त्यात पडणार आहेत. त्यानंतर जूनपासून पावसाळा सुरू होत असल्याने आचारसंहितेपूर्वी कामांसाठी उपलब्ध निधीचा संपूर्णपणे विनियोग करण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे.

यांचा शंभर टक्के निधी खर्च
मंत्री भुजबळ व नरहरी झिरवाळांसोबत शंभर टक्के निधी खर्च करणाऱ्या आमदारांमध्ये नाशिक पूर्वच आमदार राहुल ढिकले, सिन्नरचे माणिकराव कोकाटे, इगतपुरीचे हिरामण खोसकर, बागलाणचे दिलीप बोरसे यांचा समावेश आहे. तसेच विधान परिषदचे आमदार नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांनीही त्यांना उपलब्ध निधी संपूर्णत: खर्च केला आहे.

फायली हातावेगळ्या
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीने डिसेंबर अखेरपासून लाेकप्रतिनिधींकडे कामांच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार तब्बल ८ लोक जानेवारी अखेरपर्यंतच १०० टक्के निधी खर्च केला. अद्यापही निधी बाकी असलेल्या लोकप्रतिनिधींकडून कामांचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर तातडीने त्यांना मंजुरी देत त्या हातावेगळ्या करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

The post वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग appeared first on पुढारी.