नाशिक : पुढारी वृत्तसेवा-केंद्र सरकारच्या ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील शिक्षेच्या कठोर तरतुदीविरोधात मनमाड येथील पेट्रोलियम कंपन्यांच्या इंधन वाहतूकदारांनी बुधवार (दि.१०)पासून पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे १४ जिल्ह्यांचा इंधनपुरवठा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने वाहतूकदार व टँकरचालकांशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली. त्यामुळे सायंकाळनंतर कंपन्यांमधून होणारा इंधनपुरवठा पूर्वपदावर आला.
केंद्राच्या नवीन कायद्यानुसार हिट ॲण्ड रन प्रकरणात ट्रकचालकांना सात वर्षांपर्यंत कारावास तसेच १० लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परंतु, अद्यापही या कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला नसल्याचे स्पष्टीकरण शासनाकडून दिले जात आहे. दुसरीकडे मात्र, ट्रकचालकांनी कायद्याला विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. पेट्रोलियम कंपन्यांच्या वाहतूकदार व चालकदेखील या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे पानेवाडी (ता. मनमाड) येथून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगरसह मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा इंधनपुरवठा ठप्प पडण्याच्या मार्गावर होता. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी येवला-नांदगावचे प्रांताधिकाऱ्यांना चर्चा करण्याचे आदेश दिले होते.
पेट्रोलियम कंपन्यांचे वाहतूकदार व टँकरचालकांशी येवल्याचे प्रांत बाबासाहेब पारधे व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या चर्चेवेळी चालकांना केंद्र सरकारची भूमिका समजावून सांगण्यात आली. तसेच याप्रश्नी शासन सकारात्मक असल्याचेही चालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर चालकांनी संप मागे घेण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी चारनंतर पानेवाडीतील सर्वच पेट्रोलियम कंपन्यांमधून एक-एक करून इंधनाचे टँकर बाहेर पडले.
दरम्यान, चालू वर्षाच्या प्रारंभीच वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला होता. या संपामुळे पेट्रोल व डिझेलसाठी पेट्रोलपंपावर अक्षरक्ष: चालकांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक ठिकाणी इंधनच उपलब्ध नसल्याने वाहनचालक बेजार झाले होते. मागील अनुभव लक्षात घेता प्रशासनाने तातडीने सूत्रे हलविल्याने इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू झाला.
वाहतूकदार व चालकांच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पहिलेच पोहोचविण्यात आल्या आहेत. संप करू नये, याबाबत वाहतूकदारांशी संवाद सुरू आहे. बीपीसीएल कंपनीतून पहिला टॅंकर बाहेर पडल्याचे समजते आहे. उर्वरित कंपन्यांचाही इंधनपुरवठा सुरळीत सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. – जलज शर्मा, जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कंपन्यांमध्ये जाऊन वाहतूकदारांशी चर्चा केली. यावेळी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यानुसार चालकांनी संप मागे घेतला असून, सर्वच कंपन्यांमधून इंधनपुरवठा सुरू झाला आहे. – बाबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी, येवला-नांदगाव
इंधन भरण्यासाठी गर्दी
पेट्रोलियम कंपन्यांचे इंधन वाहतूकदार मध्यरात्रीपासून पुन्हा संपावर जाणार, असा मेसेज सोशल मीडियातून व्हायरल झाला. हा संदेश बघताच वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी चालकांनी पेट्रोलपंपावर गर्दी करायला सुरुवात केली होती.
हेही वाचा :
- पीएच.डी. फेलोशिपचा पेपर पुन्हा फुटला; सील नसलेल्या झेरॉक्स प्रश्नपत्रिका हातात
- Weather News : राज्यात पुन्हा थंडीची लाट; अवकाळी पाऊसाचा काढता पाय
- लोकशाहीची दिवसाढवळ्या निर्लज्जपणे हत्या : आदित्य ठाकरे
The post टँकरचालकांचा संप अखेर मागे, इंधनपुरवठा सुरळीत appeared first on पुढारी.