टंचाईची धग: कळवण-लघुपाटबंधारे प्रकल्प कोरडेठाक; हातपंप मृत

कळवण (जि.नाशिक) : दुर्गादास देवरे

कळवण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई यंदा तीव्र झाली असून, मोठ्या प्रकल्पासह लघुपाटबंधारे प्रकल्पामधील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. पश्चिम भागातील अनेक गावे आणि वाड्या- वस्त्यांवर एप्रिलपासूनच पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.

दरवर्षी उन्हाळा आला की, पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू होते. त्यामुळे खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचे नियोजन सुरू आहे. तालुक्यातील बहुतांश हातपंप बंद आहेत. त्यामुळे अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे जमिनीतील पाणीपातळी खाली गेल्यामुळे पाण्याची अभूतपूर्व टंचाई जाणवत आहेत.

२१ विहिरी अधिग्रहित

कळवण तालुक्यातील जिरवाडे (ओ), पाळेपिंप्री, दह्याणे, वंजारी, ढेकळे, हिंगवे, मारुती पाडा, बिलवाडी, अंबिका ओझर, ओझर, वाडळे वणी, दरीपाडा, कुडाणे, रवळजी, गोपाळखडी, जांभळं, शिंदी पाडा, दरेगाव, हिंगवे गावठाण, मेहदर, मळगाव आदी गावांतील २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली असून, मे महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. मात्र, गिरणा व पुनंद नदीला पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे थोडाफार प्रमाणात नदीकाठाच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

निम्मा भाग तहानलेला

तालुक्‍यात पाण्याचे मोठे स्रोत असलेली एकूण लहान-मोठे १७ धरणे असताना तालुक्‍यातील निम्म्यापेक्षा जास्त भाग तहानलेला आहे. शेतीसाठी तर नाहीच नाही पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. टंचाईग्रस्त गावांतील प्रस्ताव आल्यावरच पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते , अशी दयनीय परिस्थिती असल्याने गावातील महिला नागरिक मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत.

थेंबभर पाण्यासाठी दिवस वाया

तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे. विहिरी, तळ, पाझर तलाव, धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. हंडाभर पाणी मिळण्यासाठी तासन्तास पाण्याच्या झऱ्याजवळ बसावे लागत आहे. यासाठी कामधंदा सोडून द्यावा लागत असल्याने थेंबभर पाण्यासाठी दिवस वाया जात आहे.

प्रकल्पग्रस्तांची पाण्यासाठी भटकंती

धरणात दरवर्षी मुबलक पाणीसाठा होत असतो. मात्र, उपलब्ध पाणी स्थानिकांना मिळण्याऐवजी ते दुसरीकडे सोडण्यात येते. ज्या शेतकरी बांधवांनी धरणे बांधण्यासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या त्यांच्या उर्वरित शेतीसाठी तर सोडाच त्यांना पिण्यासाठी पाण्याचा थेंब मिळत नाही, अशी परवड झाली आहे.

पशुधनाला घरघर

पाणीटंचाईमुळे गोठ्यातील आणि जंगलातील पशू-पक्षी यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन सातत्याने घटत चालले असून, त्यावर उपजीविका करणारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनत चालले आहे. तालुक्‍यातील पशू-पक्षी संख्या घटत चालली आहे.

भ्रष्टाचारामुळे अडेना पाणी

शासनाकडून जलस्रोत निर्माण करण्याची अलीकडील काळात प्रयत्न झाले. मात्र, या योजना राबविणाऱ्या आणि प्रत्यक्ष त्याचे काम करणाऱ्यांनी कामे निकृष्ट दर्जाची केली. या कामात भ्रष्टाचार झाला असताना नागरिक तक्रारी करत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केलेल्या कामांमध्ये पाण्याचा एक थेंबही साठत नसल्याने याला कारणीभूत कोण, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

ज्या गावांना पाणीटंचाई आहे त्या गावातील खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सध्या तालुक्यात पाणीटंचाई नाही. कळवण तालुक्यातील एकूण २१ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. -रोहिदास वारुळे, तहसीलदार

दोन मोठे, १२ मध्यम प्रकल्प

चणकापूर, अर्जुनसागर ( पुनंद ) या दोन मोठ्या प्रकल्पाबरोबर भेगू, धनोली, जामले, नांदुरी, ओतूर, गोबापूर, मार्कंडपिंप्री, धार्डेदिगर, मळगाव, बोरदैवत, भांडणे, खिराड या मध्यम प्रकल्पाबरोबर पुनंद व चणकापूर प्रकल्प अंतर्गत सात कालवे,पाटचाऱ्या, शेकडो पाझर तलाव, कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट बंधारे आहेत.

  • कळवण तालुका:-
  • गावे : १५२,
  • आदिवासी पाडे : ८९
  • नळ पाणीपुरवठा योजना : ६५
  • वीजपंपासह योजना: ४२
  • हातपंप: ४५०
  • बंद पडलेल्या योजना: १००

हेही वाचा: