नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महायुतीत नाशिकच्या जागेचा गुंता सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी (दि. ३१) तर महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्याने, गुंता आणखीनच वाढला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने आपला उमेदवार देऊन उमेदवार निवडीत महायुतीवर काहीशी सरशी घेतली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, अशातही या जागेवर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने गुंता वाढला आहे. प्रारंभी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या जागेसाठी आग्रही मागणी केली. त्यानंतर महायुतीच्या वाटेवर असलेल्या मनसेनेही जागा पदरात पाडून घेण्यासाठी आटापिटा केला. मात्र, या सर्व गोंधळात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने, नाशिकची जागा राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक चर्चेची जागा ठरत आहे. हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला सुटणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, रविवारी नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दावा केल्याचे दिसून आले. भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक लाेकसभा मतदारसंघात भाजपची सर्वाधिक ताकद असून, ही जागा भाजपच्या वाट्याला यावी, अशी मागणी केली. तर शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी, गेल्या दहा वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून, येथील खासदार हेमंत गोडसे प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे या जागेवरच आमचाच दावा असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील बैठक घेत नाशिकच्या जागेवर मंथन केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मविआ उमेदवाराने प्रचाराचा नारळ फोडला असताना, महायुतीच्या उमेदवारांचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणामध्ये थेट लढत होईल, याविषयी नाशिककरांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे.
The post तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना appeared first on पुढारी.