नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगे-पाटील करत आहेत. परंतु संपूर्ण ओबीसी समाज छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही एक भुजबळ पाडाल, तर आम्ही मराठा समाजाचे १६० उमेदवार पाडू, असा खणखणीत इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी भुजबळ निवडणुकीत उभे राहू द्या, मग सांगतो, असा इशारा दिला आहे. यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे-पाटलांवर निशाणा साधला आहे. शेंडगे म्हणाले की, आम्ही सर्व जण छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभे राहू. त्यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगेंकडून होत आहे. मात्र, तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही १६० उमेदवार पाडू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. नाशिकमध्ये आम्ही सर्व जण प्रचारात उतरू. संख्येच्या गणिताने बघितले तर छगन भुजबळ यांना पाडणे अशक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, आता हे जरांगेंनी सर्व थांबवले पाहिजे. आमच्या उमेदवारीचा तोटा आणि फायदा कोणाला होईल यासंदर्भात आमची लढाई नाही. आमची लढाई ही आरक्षणाची आहे. आरक्षणाचे तीन तेरा सर्व पक्षाच्या लोकांनी वाजवले आहेत. ईव्हीएम हॅक होऊ शकते, असे अनेकदा सिद्ध झालेय. व्हीव्हीपॅटचे ट्रेल मिळावेत यासंदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत, असेदेखील प्रकाश शेंडगेंनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- परभणी: पूर्णा येथे बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्या तिघांना अटक
- वाशिम: ग्राम शेलूबाजार येथून छापा टाकून ३ लाखांचा गुटखा जप्त
- तुला शिकवीन चांगलाच धडा, शिवामध्ये गुढीपाडव्याचा जल्लोष
The post तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा appeared first on पुढारी.