त्र्यंबकला भरवस्तीत घरफाेडी, सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास

घरफोडी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- येथे गुरूवारी पहाटे भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. संत निवृत्तीनाथ मंदिर रस्त्यावरील सुतार धर्मशाळेच्या बाजूला असलेल्या शंकर मोरे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी किचनच्या लॉकरमधील पाच लाख ८१ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेत.

याबाबत धनश्री शंकर मोरे (४०) यांनी फिर्याद दिली आहे. शंकर मोरे हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांची पत्नी धनश्री या वरच्या मजल्यावर झोपी गेल्या होत्या. या दरम्यान, चोरट्यांची घरफोडी केली. सकाळी नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत फिरायला गेलेल्या नागरिकांना तेथे एक बेवारस बॅग दिसली. त्यामधील कागदपत्रांवरुन ओळखीचे असलेले नाव बघून त्यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता चोरी झाल्याचे उघड झाले. दरम्यान आजूबाजुच्या इमारतींवर असलेले सीसीटीव्ही तपासले असता रात्री दोन वाजून काही मिनिटांनी हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्वानपथकदेखील पाचारण करण्यात आले होते. चोरांना पकडण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा-

The post त्र्यंबकला भरवस्तीत घरफाेडी, सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.