दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा

आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विकासासाठी शहराला नेतृत्वाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने नाशिकला तसे नेतृत्वच मिळू शकले नाही. नाशिक दत्तक घेणारे पिता बहुमताने सत्ता देऊनही नाशिकचा विकास करू शकले नाहीत. नाशिकच्या विकासाचा त्यांना विसर पडला, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शहरांच्या शाश्वत विकासाचा राजकारण्यांना विसर पडला आहे. सध्या राजकारणच अधिक होत आहे, असे परखड मतही त्यांनी मांडले.

नाशिक येथे यंग इंडियन्सकडून आयोजित ‘यंग इंडियन्स टॉक’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यंग इंडियन्सचे तन्मय टकले, वेदांत राठी यांनी विविध प्रश्नांतून आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला. नाशिकच्या सर्वांगीण विकासाबाबत ते म्हणाले की, नाशिकचा ज्या वेगाने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही, हे खरे आहे. मला राजकीय बोलायचे नाही. पण, ब्ल्यू प्रिंट, शहर दत्तक घेणार, हे सगळे होऊन गेले. महापालिकेत बहुमत असूनही शहर विकासाची कामे झाली नाहीत. नाशिकचा आवाज बुलंद करणारे, नाशिकला वेगाने पुढे नेणारे स्थानिक नेतृत्व पुढे आले नाही. शहरांच्या शाश्वत विकासाठी रस्ते, पार्क, कचऱ्याची विल्हेवाट, घरोघरी गॅस, मुबलक पाणीपुरवठा, फूटपाथ, पाणी निचरा, प्राथमिक शाळा, रुग्णालये, मोकळी, स्वच्छ हवा या सुविधा मिळणारे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आर्थिक नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. नाशिक हे समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी आहे. येत्या 10 वर्षांत लोकसंख्या झपाट्याने वाढेल, शहराचा विस्तार होईल, अशावेळी शेवटच्या टप्प्यापर्यंतची वाहतूक व्यवस्था, नियोजन होणे गरजेचे आहे. माझा मतदारसंघ व मला कुठून मते मिळतील, याचा विचार न करता शहराच्या प्रत्येक भागाचा विकास झाला तर शहर नक्कीच पुढे जाते. लोकांची मने ही कामाने जिंकता येतात, हा विचार राजकारण्यांनी करायला हवा, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

स्वच्छ राजकारणासाठी तरुणांनी पुढे यावे

सध्या राजकारणात प्रचंड चिखलफेक सुरू आहे, परिस्थिती खराब आहे. राजकारणी असणे ही शिवी झाली आहे. कोण कुठे निर्लज्जपणे उड्या मारतो, आज काय, उद्या काय बोलतोय, कोण कुठल्या बाजूला बसतोय हे कळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटते की, राजकारण सोडून कुठल्याही क्षेत्रात जावे, अशी स्थिती आहे. पण, ज्यांना आवड आहे त्यांनी राजकारणात यावे, तरुण आले तरच राजकारण सुधारू शकू, स्वच्छ करू शकू, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

The post दत्तक पित्याला नाशिकचा विसर ; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा appeared first on पुढारी.