दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

नाशिक : सतीश डोंगरे

गेल्या पाच, सात वर्षांत मुंबई, पुण्याकडीलच नव्हे तर ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरमधील नाशिकमध्ये स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढल्याने येथील रिअल इस्टेटचे दर वाढता वाढत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या एकूण गृहखरेदी-विक्रीतील ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार मुंबई-पुण्याकडील गुंतवणूकदारांमार्फत होत असल्याने शहरासह उपनगरांमधील प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील पाच वर्षांत प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने, ‘नाशिक’ गुंतवणुकीचे हाॅट स्पॉट ठरत आहे.

मोक्याचे स्थान आणि भक्कम पायाभूत सुविधांमुळे नाशिकने नवीन बेंचमार्क सेट करून प्रॉपर्टीच्या दरांमध्ये मोठी झेप घेतली आहे. वेगवान शहरीकरण, औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, नैसर्गिक सौंदर्य यासारखे घटक बाजाराच्या वाढीस हातभार लावत आहेत. फ्लॅट, प्लॉटसह जमिनींच्या दरात सोन्याप्रमाणे वाढ होत असल्याने, नाशिकसह मुंबई, पुणे शहरातील गुंतवणूकदार सक्रिय झाले आहेत. २०१७ ते २०२४ या कालावधीचा विचार केल्यास नाशिकच्या प्रॉपर्टी मार्केटच्या दरात ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आतापर्यंत नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण शालिमार, सीबीएस या परिसराकडे बघितले जात होते. मात्र, आता उंटवाडी, गोविंदनगर हा परिसर नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून विकसित होत आहे. या भागातील प्रॉपर्टी मार्केटचे दर गगनाला भिडले आहेत. त्याव्यतिरिक्त उपनगरांमध्येदेखील प्रॉपर्टी दरात मोठी वाढ झाली आहे.

शहरातील विविध भागांमधील प्रॉपर्टींचे दर (सर्व दर प्रतिचौरस फूट याप्रमाणे आहेत)
शालिमार : ७ ते ८.५ हजार
एमजी रोड : १० ते ११.५ हजार
सीबीएस : ७.५ ते १०.५ हजार
तिडके कॉलनी : ६ ते ७.५ हजार
कॉलेज रोड : ९ ते १२.५ हजार
कॅनडा कॉर्नर : ८.५ ते ११.५ हजार
महात्मानगर : ७.५ ते ९.५ हजार
गंगापूर रोड : ७.५ ते ८.५ हजार
म्हसरूळ गाव : ३३०० ते ३८००
आनंदवल्ली गाव : ५.५ ते ७.५ हजार
रासबिहारी लिंक रोड : ६२०० ते ८.५ हजार
पंचवटी : ३.५ ते ६.५ हजार
इंदिरानगर : ४.५ ते ८ हजार
पाथर्डी फाटा : ३.५ ते ५ हजार
द्वारका : ५ ते ७.५ हजार
सातपूर : ३.५ ते ४.५ हजार
आडगाव : ३ ते ४.५ हजार
गोविंदनगर : ६ ते ७.५ हजार
मखमलाबाद : ३.५ ते ४.५ हजार

जागेची मुबलकता
२०११ च्या जनगणनेप्रमाणे नाशिकची लोकसंख्या १४ लाख ९० हजार ५३ इतकी आहे. मात्र, सद्यस्थितीत हा आकडा सुमारे २२ लाखांवर पोहोचला आहे. इतर जिल्ह्यांतून नाशिकमध्ये स्थायिक होणाऱ्याची संख्या मोठी असल्याने, नाशिक शहराच्या लोकसंख्येत सातत्याने भर पडत आहे. दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकरांच्या मते, नाशिक शहराची लोकसंख्या ६० लाखांवर पोहोचली तरीदेखील शहरातील रहिवासी जमीन क्षेत्र अपुरे पडणार नाही.

हेही वाचा:

The post दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ appeared first on पुढारी.