नाशिक : पुढारी वृत्तसेवा – भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील एनडीए 543 पैकी 350 जागा जिंकण्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोलने वर्तवल्यानंतर सोमवारी (दि. 3) दलाल स्ट्रीटवर तेजीवाले आपली पकड घट्ट करतील, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत बाजार विश्लेषक निफ्टी फिफ्टीच्या आगामी रॅलीबद्दल अतिशय उत्साही आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार गुंतवणूकदारांमधील निवडणुकीशी संबंधित अस्वस्थता दूर झाली असून, तीन जूनला निफ्टी थेट २३ वरच उघडत २३,४०० चे दर्शन देण्याची शक्यता अनेक नामवंत ब्रोकिंग फर्म्सने व्यक्त केली आहे.
एक्झिट पोलचे निकाल एनडीएला सुमारे 360 जागांसह स्पष्ट विजय दर्शवित आहेत. मे महिन्यात बाजारात निर्माण झालेली अस्थिरता एक्झिट पोलने तूर्त हटविल्याचे मत विविध रिसर्च फर्म्सने व्यक्त केले आहे. तेजीवाल्यांसाठी हा अतिशय मोठा दिलासा असून, ते सोमवारी बाजाराला चालना देताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात निकालाच्या अनिश्चिततेने मोठ्या प्रमाणात शॉर्ट उभे राहिलेले आहेत. त्यांची कोंडी झाल्याने बाजारात तेजीचा वारू चौफेर उधळणार असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून दिसत आहे.
मतदानाचे टप्पे संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जूनला आपल्याच पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत दिसेल, असा दावा शुक्रवारी केला. त्यामुळे तेजीवाल्यांना आणखी स्फुरण चढले आहे. जर मोदी जिंकले तर ते पंडित जवाहलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारी दुसरी व्यक्ती ठरणार आहे.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने 353 जागा जिंकल्या होत्या. यात भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीए 350 प्लसचा आकडा ओलांडताना दिसणार आहे. दक्षिण भारतासारख्या कठीण राज्यांमध्ये भाजपची कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल एक्झिट पोलपेक्षा भिन्न असू शकतो. तथापि तत्काळ चढउतार दाखविणाऱ्या समभागांसारख्या जोखमीच्या मालमत्तेसाठी आणि मध्यम मुदतीत आर्थिक स्थिरतेसाठी देशातील राजकीय वातावरणात सातत्य खूपच सकारात्मक राहण्याची शक्यता एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा यांनी व्यक्त केली आहे.
बहुतांश बाजार विश्लेषकांनी आगामी सत्रांत एक्झिट पोलच्या अंदाजांवर आणि देशाच्या ढोबळ आर्थिक आकडेवारीच्या आधारावर बाजार एका व्यापक वळणावर उभा असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शुक्रवारी सरकारने जीडीपीचे जबरदस्त आकडेवारी जाहीर केल्याने भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपला मुकूट कायम ठेवला आहे. त्यामुळे तेजीवाले दलाल खुशीत असून, सोमवारी बाजारात सकाळपासून तेजीचा माहौल दिसणार आहे.
जीडीपीमुळे दलाल स्ट्रीट खूश
भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीत 7.8 टक्क्यांवर आले आहे. उत्पादन क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे जीडीपी उसळला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने दलाल स्ट्रीटच्या अंदाजांना मागे टाकताना पूर्ण वर्षासाठी म्हणजेच २०२३-२४ साठी 8.2 टक्के वाढ नोंदविली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था या बिरुदावलीमुळे मंदीवाल्या दलालांना सोमवारी बाजारातून माघार घ्यावी लागणार आहे.
पुन्हा लार्जकॅप्सचा बोलबाला
सोमवारी सकाळच्या तेजीच्या सत्रात फायनान्शियल, भांडवली वस्तू, ऑटोमोबाइल्स आणि दूरसंचार क्षेत्रातील लार्जकॅप्स तेजीच्या रॅलीचे नेतृत्व करतील. मेटल, आयटी, फार्मा, एनर्जी आणि एफएमसीजी क्षेत्रे ही प्रमुख पिछाडीवर आहेत. तेही उसळी घेण्याची शक्यता आहे. मे महिन्यातील वाहन विक्रीचे आकडे सोमवारी (दि. ३) जाहीर होणार असल्यामुळे बाजाराचे लक्ष ऑटो क्षेत्रावर असेल. ऑटो क्षेत्रातील समभाग एकसमान पातळीवर राहत किंचित तेजी दर्शवू शकतात.
बँक निफ्टी कमाल दाखविणार
बँक निफ्टी 48,000-48,300 या महत्त्वाच्या ५० दिवसांच्या सरासरी पातळीवर असून, निफ्टी निर्देशांकाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. तिने 49,000 हजार अंशांची पातळी ओलांडणे आवश्यक आहे. बँक निफ्टीला सध्या 47,200 या पातळीवर सपोर्ट आहे. तर सेन्सेक्सला 73,400 वर सपोर्ट आणि 74,400 या पातळीवर विक्रीचा प्रतिरोध आहे.
लाँग-शॉर्ट रेशो तळपातळीवर
विदेशी गुंतवणूकदार वित्तसंस्था (एफआयआय) यांचा लाँग-शॉर्ट रेशो 13 टक्के आणि 87 टक्क्यांच्या अत्यंत तळपातळीवर आलेला आहे. त्यामुळे बाजार सकाळीच उसळीने झपझप वर जाताना दिसणार आहे. संभाव्य शॉर्ट कव्हरिंग रॅली यातून सूचित होत असून, दुपारी एकपर्यंत निफ्टी २३ ४०० प्लसचे दशन देईल, असा अंदाज आहे.
हेही वाचा: