Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी

Body Mass Index pudhari.news

नाशिक : गौरव अहिरे

दरवर्षी पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या शारीरिक सुदृढतेबाबत शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स) चाचणी केली जाते. त्यानुसार शहर पोलिस दलातील ९०९ पोलिस अधिकारी – अंमलदारांचा बीएमआय २५ च्या आत आल्याने ते ‘फिट ॲंड फाइन’ असल्याचे चाचणीतून समोर आले आहे. तर ३४४ पोलिस ‘वजनदार’ झाल्याचा निष्कर्ष चाचणीतून निघाला आहे. (Body Mass Index)

शहर पोलिस दलातील १ हजार २५३ पोलिसांनी बीएमआय चाचणी (Body Mass Index) केली होती. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांवर शारीरिक, मानसिक दबाव असतो. पोलिस दलात सहभागी होताना सर्वच पोलिस पिळदार शरीरयष्टीचे व सुदृढ असतात. मात्र, कामाचा अतिरिक्त ताण, वेळेचे नियोजन नसल्याने शारीरिक व मानसिक ताण वाढत असल्याच्या तक्रारी असतात. १२ तास किंवा त्याहून अधिक वेळ ड्यूटी करावी लागत असल्याने कौटुंबिक व नोकरीची जबाबदारी सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच दैनंदिन नित्यक्रम स्थिर नसल्याने कालांतराने पोलिसांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. त्यातून लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या पोलिसांना होतात. तसेच इतरही आजार जडतात. मात्र शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी पोलिस सजग झाले आहेत. त्यामुळे पोलिस दलातील ढेरीवाल्या पोलिसांची जागा आता तंदुरुस्त पोलिस घेत असल्याचे सकारात्मक चित्र पाहावयास मिळते. तसेच पोलिसांच्या कामाची वेळ, जबाबदारी यांत सुसूत्रता आणून पोलिसांवरील ताण कमी करण्याचे प्रयत्न पोलिस प्रशासन करीत आहे. पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारही जिम, व्यायामशाळा, मैदानांवर घाम गाळत आहेत. त्यामुळे स्थुल शरीरयष्टीची जागा पिळदार शरीरयष्टी घेत आहे.

यांची होते चाचणी
पोलिस फिट ॲंड फाइन राहण्यासाठी राज्य शासनाने २००७ पासून पोलिसांची बीएमआय चाचणी (Body Mass Index) करण्यास सुरुवात केली. पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे, यासाठी ३० वर्षांपुढील पोलिसांची बीएमआय चाचणी होते. तंदुरुस्त असणाऱ्या पोलिसांना दरमहा २५० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

पोलिस शिपाई ते निरीक्षकांपर्यंत चाचणी
शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स) हे वयानुसार शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. वजनाला उंचीच्या वर्गाने भागले असता निर्देशांक कळतो. १८ ते २५ हा सामान्य निर्देशांक आहेत. २५ ते ३० निर्देशांक हा वाढलेल्या वजनात मोडतो, तर ३० च्या पुढील निर्देशांक असणाऱ्यांना लठ्ठपणा आहे असे म्हटले जाते. त्यानुसार पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या पोलिसांचे शरीर वस्तुमान निर्देशांक करण्यात येते.

मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी आम्ही पोलिस ठाणेनिहाय मार्गदर्शन करीत आहोत. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक केली जात आहे. ताणतणाव कमी झाल्यास शारीरिक व्याधीही कमी होतात. त्याचप्रमाणे आहार व व्यायामाबाबतही पोलिसांना मार्गदर्शन केले जात आहे. पोलिस अधिकारी व अंमलदार आरोग्याकडे लक्ष देत आहेत. योगा, व्यायाम, चालणे, धावणे, सायकल चालवून पोलिस स्वत:ला तंदुरुस्त ठेवत आहेत. तसेच ज्यांचे वजन वाढले आहे त्यांनाही मार्गदर्शन करून मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त करण्यावर भर राहील. -संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त.

The post Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी appeared first on पुढारी.