वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली आहे. दिंडोरी मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेवारी देण्यात आली आहे. जळगावमध्ये ग्रामविकास मंत्री यांचे एकेकाळचे सहकारी प्रफुल्लकुमार लोढा यांना तिकिट दिले असून नंदुरबारमध्ये हनुमंत कुमार सुर्यवंशी यांना संधी देण्यात आली. वंचितने उमेदवार दिल्याने उत्तर महाराष्ट्रातील लढतीत चुरस वाढली आहे.

जागा वाटपावरुन महाविकास आघाडीशी बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यात ‘एकला चलो रे’ची भुमिका घेतली आहे. त्यानुषंगाने पक्षातर्फे गुरुवारी (दि.११) रात्री उशिरा उमेदवारांची पाचवी यादी घोषित केली. या यादीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील तीन मतदारसंघासह राज्यातील दहा जागांवरील उमेदवारांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकनंतर सर्वाधिक चर्चेत असलेल्या जळगावमध्ये वंचितने सामाजिक कार्यकर्ते लोढा यांना तिकिट दिले. लोढा हे महाजनांचे एकवेळचे निकटवर्तीय होते. कोरोना काळात त्यांनी महाजनांची साथ सोडत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. वंचितने याच लोढांना निवडणूकीच्या रिंगणात ऊतरविले आहे. त्यामुळे जळगावमध्ये भाजपा, शिवसेना ठाकरे गट तसेच वंचित अशी तिहेरी लढत रंगणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून गुलाब बर्डे निवडणूक लढणार आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने चौथ्या क्रमांकाचे ३४ हजारांच्या आसपास मतदान घेतले होते. यंदाही वंचितच्या ऊमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूकीतील चुरस कायम असणार आहे. नंदुरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना तिकिट देण्यात आले आहे. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी व वंचित यांच्या उमेदवारांमध्ये खरी लढत असणार आहे.

नाशिकबद्दल वेट अॅण्ड वॉच

महायुतीमधील रस्सीखेचमुळे नाशिकची जागा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरते आहे. शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वीच आपला ऊमेदवार घोेषित केला आहे. नाशिकला महायुती कोणता उमेदवार देणार यावरुन उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय वंचित घेणार आहे. महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. भुजबळांची ऊमेदवारी पक्की झाल्यास वंचित देखील उमेदवार देऊ शकते.

हेही वाचा –

The post वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी? appeared first on पुढारी.