निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर

मतदार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५५ सहाय्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेतर्फे या केंद्रांसाठीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयाेगाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये सर्वाधिक २६ केंद्रे ही नाशिक पश्चिम मतदारसंघातील आहेत.

अवघ्या तीन आठवड्यांमध्ये लोकसभेचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. आगामी निवडणुकीमधून मतदारांना अधिकाधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, उन्हापासून बचावासाठी शेड, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर अशा विविध सोयी पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मतदारांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर उभारण्यात आली आहेत. त्यासोबत ज्या केंद्रामध्ये दीड हजारांहून अधिक मतदार आहेत, अशा ठिकाणी विभाजन करून सहाय्यकारी केंद्र उभारावे, असे आदेश आयोगाचे आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने जिल्ह्यात एकूण ४ हजार ७३९ मतदान केंद्रे अंतिम करण्यात आली आहेत. या केंद्रांसोबत मतदारांच्या सोयी-सुविधेसाठी पंधरा तालुक्यांमध्ये ५५ सहाय्यकारी केंद्रे उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीयस्तरावर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. आयोगाने मान्यता दिल्यानंतर तातडीने त्या-त्या मतदारसंघांमध्ये केंद्रे उभी करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रास्तावित सहाय्यकारी केंद्रे
नांदगाव ४, मालेगाव मध्य २, मालेगाव बाह्य ६, बागलाण ५, कळवण ४, येवला २, निफाड १, दिंडोरी २, नाशिक पूर्व १, नाशिक पश्चिम २६, देवळाली १, इगतपुरी १, एकूण ५५.

६४ मतदान केंद्रांमध्ये बदल
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाने ६४ मतदान केंद्रांमध्ये बदल केला आहे. त्यात मोडकळीस आलेल्या इमारती, देखभाल-दुरुस्ती नसलेल्या तसेच मतदारांसाठी गैरसोयीचे असलेल्या केंद्रांचा यात समावेश आहे. बदल केलेल्या केंद्रांमध्ये नाशिक पश्चिमचे सर्वाधिक ४९ केंद्रे आहेत. याशिवाय निफाडमध्ये ६, चांदवडला ४, सिन्नर व नाशिक पूर्वचे प्रत्येकी दोन व देवळालीच्या एका केंद्राचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर appeared first on पुढारी.