दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बुकिंगचा धडाका

दसरा खरेदी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, मालमत्ता आणि वाहनांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने मुहूर्तावर वस्तू घरी आणता यावी यासाठी ग्राहकांकडून बुकिंगचा धडाका सुरू आहे. चारचाकी, दुचाकी, फ्लॅटसह घरगुती उपकरणे बुक केली जात आहेत. ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांकडून हा मुहूर्त साधला जात आहे. या दसऱ्याला चारचाकीसह दुचाकी खरेदीचा अनेकांचा मानस असून, डिलिव्हरी दसऱ्याच्या दिवशी घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या बाजारात एकापेक्षा एक सुविधा असलेले वाहने दाखल झाली आहेत. चारचाकीमध्ये अत्याधुनिक फिचरसह सीएनजी, इलेक्ट्रॉनिक्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दुचाकीमध्येही स्पोर्ट लुकसह स्टायलिश गाड्या उपलब्ध आहेत. मात्र, या वाहनांना वेटिंग असल्याने, दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहने घरी आणता यावीत यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच बुकिंगचा जोर सुरू आहे. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश करता यावा यासाठीही अनेकांकडून प्रयत्न होत आहेत.

शहराच्या चहूबाजूने रेडीपेजेशन घरे उपलब्ध आहेत. अशात साइट व्हिजिट करून फ्लॅटसह रो-हाउसेस बुकिंग केले जात आहे. दसऱ्याला घरगुती उपकरणेही खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने, फ्रीजसह वाॅशिंग मशिन, टीव्ही, मोबाइल खरेदीसाठी बुकिंग केले जात आहे. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सोने महागले

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार होत असल्याने यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. बुधवारी (दि.१८) सोन्याचा दर २२ कॅरेट, १० ग्रॅमसाठी ५५ हजार ४८० रुपये नोंदविला गेला. तर २४ कॅरेट १० ग्रॅमचा दर ६० हजार ५२० इतका नोंदविला गेला. दसरा-दिवाळी काळात सोने-चांदी दर कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे अचानकच दरवाढ होत गेल्याने यंदाच्या दसऱ्याला ग्राहकांना चढ्या दराने सोने खरेदी करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, सराफ व्यावसायिकांच्या मते सोने खरेदीसाठी ग्राहकांकडून आतापासूनच प्रतिसाद लाभत असून, अनेकांकडून बुकिंगवर भर दिला जात आहे.

हेही वाचा :

The post दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बुकिंगचा धडाका appeared first on पुढारी.