सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा

पीडब्ल्यूडी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध १४ संवर्गांतील तब्बल २ हजार १०९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी दि. ६ नाेव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली हाेती. टीसीएसमार्फत भरती प्रक्रिया राबविली जात असून, भरतीच्या पुढच्या टप्प्यात दि. १३ डिसेंबरपासून परीक्षेचे नियाेजन करण्यात आले आहे. दि. २८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या परीक्षेसाठी लवकरच हाॅल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दरम्यान, परीक्षेसाठी नकारात्मक गुणांकन पद्धती नसून, पेपर साेडविण्यासाठी उमेदवारांना दीड तासाचा अवधी देण्यात येणार आहे. इंग्रजी, मराठी, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान यांसह तांत्रिक विषयांवर आधारित १०० गुणांसाठी प्रश्न असणार आहेत. काठिण्य पातळी मध्यम स्वरूपाची राहणार असल्याचे पीडब्ल्यूडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पदांसाठी होणार परीक्षा

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सरळसेवा भरती प्रक्रिया- २०२३ अंतर्गत अभियंता स्थापत्य या संवर्गातील ५३२, तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील तब्बल १ हजार ३७८ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- ५३२, कनिष्ठ अभियंता (विद्युत)- ५५, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ- ५, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- १,३७८, लघुलेखक उच्च श्रेणी- ८, लघुलेखक निम्न श्रेणी- २, उद्यान पर्यवेक्षक- १२, सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ- ९, स्वच्छता निरीक्षक- १, वरिष्ठ लिपिक- २७, प्रयोगशाळा सहायक- ५, वाहनचालक- २,स्वच्छक- ३२, शिपाई- ४१ या पदांचा समावेश आहे.

असे असेल परीक्षेचे वेळापत्रक

१३ डिसेंबर : स्वच्छक

१४ डिसेंबर : कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्टेनाेग्राफर, लिपिक, उद्यान पर्यवेक्षक, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

१५ डिसेंबर : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), चालक, शिपाई

१६ डिसेंबर : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), प्रयोगशाळा सहायक, स्टेनाेग्राफर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

२८ डिसेंबर : स्थापत्य अभियांत्रिकी सहायक

हेही वाचा :

The post सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा appeared first on पुढारी.