Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई

गुटख्यासह मुद्देमाल जप्त

वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; वणी-पिंपळगाव बसंवत रस्त्यावरील जऊळके वणी गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी आयशर गाडी पोलिसांनी पकडली. त्यात ४८ लाख २० हजार ४६० रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्याच्या गुटख्यासह ६३ लाख २० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक महिन्यात वणी पोलिसांनी दुसरी मोठी कामगिरी बजावली आहे.

वणी – पिपंळगाव रस्त्यावर जऊळके वणी शिवारात बुधवार, (दि. १८) रोजी दुपारी १. ३० वाजेच्या सुमारास वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीनूसार पिंपळगाव बाजूकडून वणीच्या दिशेन गुटख्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक येणार असल्याच्या माहितीवरुन वणी पोलिसांनी नाकाबंदी केली.  पोलिसांनी संशयीत आयशर ट्रक क्रमांक एमएच १८ बीजी ०२४० ट्रक अडविला. यावेळी ट्रकचे चालक व क्लिनर यांची वाहानातील मालाबद्दल पोलिसांनी चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांंनी वाहनात असलेल्या मालाची तपासणी केली. त्यांना विमल, रजनीगंधा, तुलसी, आरएमडी कंपनीचे वेगवेगळ्या वजनाचे व किमंतीचे असलेले गुटख्याच्या पुड्या असलेले बॉक्स, पोती आढळल्या. यात पोलिसांनी संपूर्ण गुडख्याची मोजदाद केली असता ४८ लाख २० हजार ४६० कंपनीचे गुटखा, १५ लाख किमंतीचा आयशर ट्रक असा ६३ लाख २० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांनी वाहनचालक देवेंद्रसिंग पर्वतसिंग चौहान, शुभम पर्वतसिंग चौहान रा. देवलगांव घुगडीया, ता. गोगावा, जि. खरेगाल (मध्यप्रदेश) यांना अटक केली असून पोलिस हवालदार राहुल यादव आहेर यांचे फिर्यादीवरुन अन्न सुरक्षा व मानके कायदा सन 2006 व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे तपास करीत आहे.

हेही वाचा :

The post Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई appeared first on पुढारी.