दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी…

दादा भुसे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची दिल्लीत बैठक होत असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने लढलेल्या जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत आणखीन एक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्या मध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. तीन्ही पक्षांचे नेते जागांवरुन दररोज नवनविन विधाने व दावे करत असताना सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपाला उद्देशून विश्वासघात केल्यास याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा दिला आहे. त्यानंतर भाजपा-सेनेच्या नेत्यांमध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. यासर्व पार्श्वभुमीवर शुक्रवारी (दि.८) नाशिक दाैऱ्यावर असलेल्या मंत्री भुसे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर गेल्यावेळी शिवसेनेने लढलेल्या जागांवर आमचा दावा कायम आहे. जागा वाटपाबाबत दिल्लीत आज महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सुचक वक्तव्य त्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती असून त्यावर तुमचा अधिकार नाही, असे वक्तव्य केले. या वक्तव्याबाबत मंत्री भुसे यांना विचारले असता हिंदूह्रदयसम्राट हा जनतेने बाळासाहेबांना दिलेला मान आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मर्यादित करणे योग्य नाही. तसेच बाळासाहेब ही राष्ट्रीय संपत्ती असून ती कोणा एका कुटुंबाची नाही, अशा शब्दांत भुसे यांनी ठाकरे यांना प्रतित्तुर दिलेे.

यात्रांना थारा देत नाही

कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा १३ व १४ मार्चला नाशिक जिल्ह्यात असणार आहे. या दरम्यान, खा. गांधी हे चांदवडला शेतकरी मेळावा घेणार असल्याबद्दल मंत्री भुसे यांचे लक्ष वेधण्यात आले. भुसे यांनी त्यावर बोलताना राहुल गांधी यांना शुभेच्छा आहेत. निवडणूका लागल्या कि यात्रा निघतात, असा टोला लगावला. ८० टक्के समाजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते असून सामान्य नागरिक अशा यात्रांना थारा देता नाही, अशा शब्दांत भुसे यांनी गांधी यांच्यावर टीका केली.

The post दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी... appeared first on पुढारी.