दिंडोरी-पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे सध्या दौरे सुरू असून, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपदाची संधी मिळालेल्या डॉ. भारती पवारांना पुन्हा उमेदवारी मिळण्यात यश आले असले तरी मात्र त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पेपर अवघड असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.”
डॉ. पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. उमेदवारी बदलण्यासाठी अनेकांनी भाजपनेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारी काही बदलली नाही. आता प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरल्यानंतर कांदा ताईंचा वांधा करू पाहात आहे. कांदा निर्यातबंदीनंतर शेतकरीवर्गात असलेली नाराजी कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली असून, शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी डॉ. पवारांना मोठी कसरत करून ठोस असे आश्वासन द्यावे लागणार
आहे.
दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचे घटक पक्षातील कार्यकर्ते अजून म्हणावे तसे डॉ. पवारांच्या प्रचारात दिसत नाही. महायुतीतील आमदारांमध्येही उत्साह दिसत नाही. केवळ व्यासपीठावर भाषणे ठोकली जातात. मात्र, अद्याप ते पूर्णपणे मैदानात उतरल्याचे दिसून येत नाही. मागील काळात आमदारांच्या कामांचे श्रेय घेणे हाही कळीचा मुद्दा असून, आपल्याच महायुतीच्या लोकप्रतिनिधींना मनाने आपल्यासोबत ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मतदारसंघात प्रचारादरम्यान डॉ. पवारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशेब जनता मागत असून, त्याची उत्तरे देताना दमछाक होत आहे. मंत्रिपद असतानाही मतदारसंघात भरीव अन् लोकांच्या नजरेत भरेल असे काम नसल्याने मतदारराजा नाराज आहे. मागील वेळी मादी लाटेवर स्वार झालेल्या डॉ. ताईंनी केंद्रातून मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणून मतदारसंघाचा विकास केला, असे बोलले जाते. मात्र, विकासकामांवर मत मागण्याऐवजी मोदींच्या नावाने मत मागायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
हेही वाचा –