दोन दिवसांच्या सुटीनंतर उमेदवारी अर्जासाठी आजपासून पुन्हा लगबग

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून (दि. २९) लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी पुन्हा एकदा नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. यावेळी उमेदवार व राजकीय पक्षांच्या शक्तिप्रदर्शनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजणार आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत आहे.

लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना गेल्या शुक्रवारी (दि. २६) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातून तीन अर्ज दाखल झाले. त्यामध्ये नाशिकमधून एक व दिंडोरी मतदारसंघातून दोघा उमेदवारांनी अर्ज भरले. तर ६४ उमेदवारांनी १२७ अर्जांची खरेदी केली. मात्र, शनिवार (दि.२७) तसेच रविवार (दि.२८) अशी सलग सुटी असल्याने अर्ज दाखल करायची प्रक्रिया काहीशी थंडावली हाेती.

नाशिकच्या जागेवरून महायुतीचा तिढा अद्यापही कायम आहे. तर महाआघाडीने यापूर्वीच दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सलग दोन दिवसांच्या सुट्यानंतर सोमवारपासून (दि. २९) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. तसेच अर्जासाठी शुक्रवारी (दि. ३) अंतिम मुदत आहे. दरम्यानच्या काळात १ मे राेजी महाराष्ट्रदिनाची सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज दाखल करता येणार नाही. परिणामी अर्ज भरण्यासाठी केवळ चारच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी पुढील दोन दिवसांमध्ये अर्ज भरण्यासाठी मुहूर्त काढला आहे.

पोलिस अधिक सतर्क

लोकसभा निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा राबता वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता पोलिस विभाग अधिक सतर्क झाला आहे. शुक्रवारी (दि.२६) अर्ज भरायच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. हा अनुभव लक्षात घेता पोलिसांकडून १ मेची सुटीवगळता उर्वरित चार दिवस वाहतूक मार्गांत बदल केला जाऊ शकतो.

हेही वाचा –