नाशिक शहर तापले, हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

तापमान वाढ

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट निर्माण झाली असून, रविवारी (दि.२८) शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या पंधरवड्यात सहाव्यांदा पारा चाळिशी पार जाऊन पोहोचला आहे. तळपत्या उन्हासह नाशिककरांना तीव्र चटके सहन करावे लागत आहे.

उत्तर भारताकडून विशेषत: राजस्थानच्या दक्षिण भागातून येणाऱ्या तप्त लहरींमुळे महाराष्ट्र भाजून निघाला आहे. बहुतांश जिल्ह्यांच्या तापमानात सरासरी २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. नाशिकमध्येही तापमानवाढीचा परिणाम दिसत आहे. रविवारी पारा ४१ अंशांच्या पलीकडे जाऊन स्थिरावला. परिणामी सुट्टी असूनही नागरिकांनी घरीच कुटुंबासमवेत वेळ घालविणे पसंत केले. सकाळी १० वाजेपासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारी तुरळक गर्दी दृष्टीस पडत होती. त्याच वेळी उन्हाचा जोर एवढा प्रचंड होता की सायंकाळी सहानंतरही कॉंक्रीटचे तसेच डांबरी रस्त्यांवरून चालताना झळा बसत होत्या. त्यामुळे शहरवासीयांच्या अंगाची लाहीलाही होत होती.

राज्यात कोकण विभागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्या तुलनेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णेतचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. परंतु, हवामान अचानक झालेल्या बदलाचा परिणाम बघता वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिकचे एप्रिलमधील तापमान

तारीख – अंश

२८ –             ४१.२

२७ –             ४०.१

१८ –             ४०.७

१७ –             ४०.६

१६ –             ४०.७

१५ –             ४०.४

—–

अशी घ्यावी काळजी

-थेट सूर्यप्रकाशाचा संबंध टाळावा

-दुपारी १२ ते ४ वेळेत घराबाहेर पडू नये

-आवश्यक कामासाठी जाताना काळजी घ्यावी

-तहान लागलेली नसताही पाणी प्यावे

-हलकी, पातळ सुती कपडे वापरावी

-घराबाहेर पडताना छत्री, गॉगल, बूट, चप्पल वापरावे

-प्रवासात पाण्याची बाटली जवळ बाळगावी

असाही योगायोग

जिल्ह्यात यापूर्वी २८ एप्रिल २०१९ ला तापमानाचा पारा थेट ४२.८ अंशांवर जाऊन पोहोचला होता. त्यानंतर तीन वर्षांनी २८ एप्रिल २०२२ रोजी शहरात ४१.१ अंश तापमानाची नोंद झाली. तर यंदा रविवारी म्हणजेच २८ एप्रिला राेजी पाऱ्याने ४१.२ अंश सेल्सिअसवर झेप घेत २०२२ चा विक्रमी उच्चांक मोडीत काढला. वाढत्या उष्णतेसोबतच सर्वसामान्य जनता घामाघूम झाली आहे.

हेही वाचा –