शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा

युवासेना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वरिष्ठ पातळीवर रस्सीखेच सुरू असताना नाशिकच्या जागेवर शिवसेना (शिंदे गट)च्या युवा सेनेने दावा करत मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट)ला प्रतिआव्हान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार पुन्हा निवडून आणा, असे आवाहन युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केले आहे.

येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (दि.१७) शिवसेना (शिंदे गट)च्या युवा सेनेचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, युवा सेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे, सचिव दीपेश म्हात्रे, किरण साळी, राज्य समन्वयक नितीन लांडगे, उत्तर महाराष्ट्र सचिव आविष्कार भुसे, निरीक्षक अभिषेक चौधरी, सिद्धेश अभंगे, डॉ. प्रियंका पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले आदी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले की, आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प प्रत्येक युवा सैनिकाने करावा. महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा सेनेने काम करावे. नेते म्हणून नव्हे तर, कार्यकर्ता बनून पक्ष विस्तारासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्याची प्रत्येक युवा सैनिकाने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करताना केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्यास पुढील पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे कायम राहतील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला. किरण साळी, अजय बोरस्ते, युवा सेनेचे विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख रूपेश पालकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. महानगरप्रमुख दिगंबर नाडे यांनी प्रास्ताविक, आकाश कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. तर जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते यांनी आभार मानले.

पालकमंत्र्यांकडून खा. राऊत यांच्यावर टीका

सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे शासनाने अनेक योजना अमलात आणल्या आहेत. मात्र, काही लोक सकाळ झाली की, कॅमेऱ्यासमोर उभे राहून सरकारविरोधात सातत्याने गरळ ओकत आहेत. याद्वारे जनहिताच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू न देण्याचे षडयंत्र आखले जात आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत युवा सेनेने हे षडयंत्र हाणून पाडावे. केंद्र व राज्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी युवा सैनिकांची आहे, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी केले.

हेही वाचा :

The post शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा appeared first on पुढारी.