द्राक्षनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर १२ प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. देवगडचा हापूस, रत्नागिरीचा केशर, गुजरातचा आम्रपाली, हैदराबादचा मल्लिका यासह इतर प्रकारच्या आंब्यांनी बाजारपेठ व्यापली असून, खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ झाली असली तरी, त्याचा खरेदीवर फारसा परिणाम होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
आंब्याचे माहेरघर असलेल्या कोकण, हैदराबादमध्ये अवकाळीचा फटका बसल्याने, यंदा येथील आंबा नाशिकच्या बाजारपेठेत उशिराने दाखल झाला आहे. प्रारंभी अवकाळीमुळे आंब्यांची आवक घटून त्याचा भाववाढीवर परिणाम होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, अक्षय्यतृतीयेच्या १५ दिवस अगोदरच नाशिकमधील बाजारपेठांमध्ये आंब्यांची आवक होण्यास सुरुवात झाल्याने, द्राक्षनगरीत आंब्यांचा बोलबाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी जेव्हा नाशिकच्या बाजारात किरकोळ स्वरूपात हापूस आणि केशर आंबा दाखल झाला तेव्हा आवक कमी असल्याने, हापूसचा दर बाराशे ते चौदाशे रुपये प्रतिकॅरेट इतका होता. केशरदेखील एक हजार रुपयांपेक्षा अधिक दराने प्रतिकॅरेट विकला जात होता. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांना हापूस आणि केशरची चव चाखणे अवघड झाले होते. आता आवक वाढल्याने, गुणवत्तेनुसार आंब्याचा दर ठरविले जात असून, सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याचे दिसून येत आहे. केशर आंबा अवघ्या १६० ते १८० रुपये किलोने विकला जात असून, हापूस दोनशे रुपये किलो दराने विकला जात आहे.
याव्यतिरिक्त बाजारात आंब्यांचे अनेक प्रकार उपलब्ध असल्याने, ग्राहकांना भरपूर चाॅइस मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, अक्षय्यतृतीयेला पितरांना दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्यात आमरसाला महत्त्व असल्याने, नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी केले जात आहे. विशेषत: कॅरेट खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
हे आंबे बाजारात दाखल (दर किलोमध्ये)
– रत्नागिरी हापूस – २०० रु.
– देवगड हापूस – २०० रु.
– जुनागड केशर – १८० रु.
– रत्नागिरी केशर – १८० रु.
– बँगलोर लालबाग – १०० रु.
– विजयवाडा बदाम – १२० रु.
– आम्रपाली गुजरात – १४० रु.
– हैदराबाद मल्लिका – १३० रु.
– रत्नागिरी पायरी – १२० रु.
– हिमायत – १०० रु.
– दशरा बेगनपल्ली १२० रु.
– लंगडा १०० रु.
आंब्यांची परदेशवारी
लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून मोठ्या प्रमाणात आंबा अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशांमध्ये निर्यात करण्यात आला आहे. केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यांची निर्यात झाली आहे. १ ते ४ एप्रिलदरम्यान, २८ टन आंबा निर्यात झाला होता. आता यात मोठी वाढ झाली असून, सातत्याने आंबा परदेशात निर्यात केला जात आहे.
हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूससह इतर आंबे नाशिकच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्यामुळे खरेदीकडे ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दरांमध्ये फारशी वाढ झाली नसल्याने, ग्राहकांना दिलासा मिळत आहे. सध्या हापूससह विविध प्रकारचे आंबे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. – नशीम शेख, विक्रेता.
हेही वाचा: