नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल

द्राक्ष बागेचे नुकसान, www.pudhari.news

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे (Nashik Unseasonal Rain)  ३४ हजार ९५२ हेक्टरवर पिके मातीमोल झाली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवालानुसार १ हजार ३१६ गावांमध्ये हे नुकसान झाले असून, द्राक्षबागा, कांदा, भात व उसाला सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ६२ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाला सादर केला आहे.

नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्प्यात अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्याला अवकाळीसह वादळी वारे व गारपिटीने झोडपून काढले. सलग दोन दिवसांच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतीपिकांना बसला आहे. पोटच्या पाेरापेक्षा अधिक जिवापाड जपलेल्या द्राक्षबागा उन्मळून पडल्या, तर कांदा, भात, नागली, ज्वारी, मका, डाळिंबासह अन्य भाजीपाला तसेच फळपिकांचीही हानी झाली. परिणामी अगोदरच पावसाअभावी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाचा पाय अधिक खोलात गेला आहे. (Nashik Unseasonal Rain )

मुख्यमंत्र्यांनी अवकाळीग्रस्त भागाचे पंचनामे आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला बुधवारी (दि. ६) नुकसानीचा अंतिम अहवाल प्राप्त झाला. या अहवालानुसार राज्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३४ हजार ९५२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तब्बल १३ हजार १६५ गावांना अवकाळीचा फटका बसला असून, ६५ हजार ८४९ शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तालयामार्फत शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. (Nashik Unseasonal Rain)

असे झाले मूल्यांकन

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रशासनाने ३३ टक्क्यांवरील नुकसानीचे पंचनामे केले पूर्ण केले. त्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी ८५०० रुपये, बागायतसाठी १७ हजार रुपये व फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये हेक्टरप्रमाणे मूल्यांकन करून अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकूण ६२ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.

क्षेत्रनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

कोरडवाहू : ५,७९०.२३

बागायत : १४,५२३.५९

बहुवार्षिक फळपिके : १४,६३८.२१

प्रमुख पीक नुकसान (हेक्टर)

द्राक्ष : १४,३८०.४४

कांदा : ११,५३५.२८

भात : ४,६७७.९३

गहू : १,१११.२२

भाजीपाला : ८६६

टोमॅटो : २९८.१०

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ३५ हजार हेक्टर पीक मातीमोल appeared first on पुढारी.