नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर रोड परिसरातील रहिवासी असलेल्या नववीमधील विद्यार्थ्याने राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले. आदित्य श्रीकांत भांडारकर (१४) असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने बुधवारी (दि. २०) सकाळी उडी मारली. गंगापूर रोडवरील सीरिनमिडोज परिसरात ही घटना घडली.
सीरिनमिडोज येथील इमारतीत राहणाऱ्या आदित्य याने बुधवारी सकाळी सव्वासात वाजता दहाव्या मजल्यावरून उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे या पथकासह दाखल झाल्या. पंचनामा केल्यानंतर आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांच्या तपासात आदित्य हा काही दिवसांपासून अबोल राहत असल्याचे समोर आले. त्याच्या जीवन संपवण्यामागे कुटुंबातील काही समस्या किंवा अभ्यासाचा ताण किंवा मोबाइलचा वापर ही कारणे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पाच वर्षांची बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
The post धक्कादायक! नववीमधील विद्यार्थ्याने दहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले appeared first on पुढारी.