धक्कादायक | नाशिकमध्ये महाविद्यालयीन परिसरात वजनकाटा घेऊन ‘ड्रग्ज’ विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सामनगाव रोड परिसरामध्ये एमडी विक्री करणाऱ्या संशयित किरण चव्हाण यास पोलिसांनी पकडले आहे. संशयित किरण हा गेल्या सात महिन्यांपासून परिसरातील महाविद्यालयीन परिसराजवळच एमडी विक्री करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. किरणला एमडी देणारे दोघे संशयित अद्याप फरार असून पोलिस तपास करीत आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने किरण चव्हाण (२३, रा. सामनगाव रोड, नाशिक रोड) यास सामनगाव रोडवर डिजीटल काट्यासह सुमारे ५८ हजार रुपयांच्या एमडी ड्रग्जसह पकडले होते. किरणकडील सखोल चौकशीतून तो गत सात महिन्यांपासून एमडी ड्रग्ज विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे. संशयित किरण यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. २२) पोलिस कोठडी सुनावली आहे. किरण हा संशयित राहुल सोनवणे, रोहित नेने यांच्याकडून एमडी घेऊन सामनगाव रोड परिसरात विक्री करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिस दोघा संशयितांचा शोध घेत आहेत.

महाविद्यालये टार्गेटवर

संशयित किरण चव्हाण हा गेल्या सात महिन्यांपासून सामनगाव रोडवरील ठराविक वेळेला येऊन डिजीटल वजनकाट्यावर एमडीची विक्री करत होता. २ ग्रॅमसाठी दीड ते दोन हजार रुपये तो घेत होता. त्यामुळे त्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना टार्गेट केल्याचे समोर येत आहे. याआधी पंचवटीतून राहुल शिंदे यास पोलिसांनी पकडले आहे. तो देखील परिसरातील महाविद्यालयाजवळच एमडी विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडीच्या नशेत अडकवल्याचा भिती वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

The post धक्कादायक | नाशिकमध्ये महाविद्यालयीन परिसरात वजनकाटा घेऊन 'ड्रग्ज' विक्री appeared first on पुढारी.