धक्कादायक | नेपाळी युवकाला दिला नाशिकचा बनावट जन्म दाखला

Fake birth certificate www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नेपाळ देशाचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीस दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात जिल्ह्यातील जन्मदाखला देणाऱ्या दोघांना म्हसरुळ पाेलिसांनी पकडले आहे. दोघांविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात बनावटीकरणासह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसे आले लक्षात ?

  • एका देवस्थानात काही दिवसांपूर्वी नेपाळी युवक युवराज थापा हा रोजगार मागण्यासाठी गेला हाेता.
  • संबंधित देवस्थान कमिटीने नोकरी देण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली
  • त्यामुळे नेपाळी युवकाने सायबर चालकाला दोन हजार रुपये देऊन बनावट जन्म दाखला बनवून घेतला.
  •  देवस्थानच्या कमिटी सदस्यांनी कागदपत्रांची छाननी केल्यानंतर पितळ उघडे पडले.

प्रविण फकीरा हुमन (३३, रा. पेठरोड) व सचिन रमेश साळवे (रा. पिंपळनारे, ता. दिंडोरी) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. संशयितांच्या सायबर कॅफेमधून अनेक महत्वाचे दस्तएेवज पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरुळ भागातील एका देवस्थानात काही दिवसांपूर्वी नेपाळी युवक युवराज थापा हा रोजगार मागण्यासाठी गेला हाेता. त्याला संबंधित देवस्थान कमिटीने नोकरी देण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार थापाने त्याच्याकडील आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर महत्वाची कागदपत्रे सादर केले. कागदपत्रांच्या छाननीत देवस्थानच्या कमिटी सदस्यांना संशय आला. त्यांनी चाैकशी केली असता, थापा याने आधारकार्ड, जन्मदाखला म्हसरुळ-मखमलाबाद लिंक राेडवरील सागर संगम साेसायटीतील तारांगण सर्व्हिसेस या सायबर कॅफेतून बनवल्याचे सांगितले. त्यानंतर सदस्यांनी म्हसरुळ पाेलिसांना याची माहिती दिली. म्हसरुळचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या सूचनेने एक पथक संशयितांच्या सायबर कॅफेत गेले. सखोल तपासात हूमन आणि साळवे यांनी संगनमत करुन बनावट आधारकार्ड व जन्मदाखले तयार केल्याचे आढळून आले. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर कॅफेतून मुद्देमाल जप्त

संशयितांच्या सायबर कॅफेतून एल. व्ही. एच. (माध्य) विद्यालय, नाशिक यांच्या मुख्याध्यापकांचा शिक्का, २७ नागरिकांचे आधारकार्ड नोंदणी अथवा अद्ययावत करण्यासाठी असलेलेल फॉर्म, विधानसभा सदस्य यांची सही व शिक्का असलेले आधारकार्ड नोंदणी, अद्ययावत करण्यासाठी आलेले पाच फॉर्म, गावंध ग्रामपंचायत कार्यालयातील जन्म दाखला, पेठ ग्राम पंचायतीचे जन्म झाल्याबाबतचे महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग यांचे निबंधक, जन्म, मृत्यु व विवाह नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले सहा जणांचे जन्म दाखले, आधार कार्डच्या दहा रंगीत प्रती, आधार कार्ड लॅमिनेट केलेल्या २५ प्रती, लॅमिनेट केलेले एकूण ४९ आधार, एनएसडीएलकडून सीलपॅक पाठविलेले २५ पॅनकार्ड, लॅमिनेट केलेले १५ पॅनकार्ड, मॉनिटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनेक वर्षांपासून बनावटीकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी गेल्या अनेक वर्षांपासून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा संशय आहे. त्यासाठी त्यांनी शाळा, शासकीय यंत्रणांची कागदपत्रे, शिक्के तयार केल्याचे समोर येत आहे. तसेच त्याआधारे बनावट आधारकार्ड, जन्म दाखले तयार करून ते इतरांना दिले. त्यामुळे संशयितांनी शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा –

The post धक्कादायक | नेपाळी युवकाला दिला नाशिकचा बनावट जन्म दाखला appeared first on पुढारी.