धुळे: गंगापूर येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलेचा एक जणावर विळ्याने वार

Crime

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर (ता. साक्री) येथे हळदीच्या कार्यक्रमात महिलेने एका व्यक्तीच्या नाकावर आणि पोटावर विळ्याने वार केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. विठ्ठल कारंडे (रा. गंगापूर, ता. साक्री) असे व्यक्तीचे नाव आहे. तर हल्लेखोर महिलेचे बायाबाई भटू कारंडे असे नाव आहे. या प्रकरणी सुनंदा विठ्ठल कारंडे (रा. गंगापूर, ता. साक्री) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर गावात गुलाब चिला गरदरे यांच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी फिर्यादी सुनंदा यांचे पती विठ्ठल कारंडे गेले होते. तेथे ते रात्री साडेआठ वाजता पंगतीत जेवण वाढत होते. यावेळी बायाबाई कारंडे ही महिला त्यांच्याजवळ गेली. आणि तुम्ही कोणाला शिव्या देत आहात?, असे म्हणत शिवीगाळ केली. बायाबाई हिला समजविण्याचा प्रयत्न केला असता तिने पुन्हा शिवीगाळ करून हातातील विळ्याने विठ्ठल यांच्या नाकावर व पोटावर वार केले. यावेळी विठ्ठल चिला गरदरे व भुरा चिला गरदरे व इतर लोकांनी मध्यस्थी करत वाद सोडविला. जखमी विठ्ठल यास साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साक्री पोलीस ठाण्यात बायाबाई कारंडेविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विसपुते करीत आहेत.

हेही वाचा