धुळे मतदारसंघातील बूथ रचनेबाबत क्षेत्रप्रमुख कदमबांडे घेतली बैठक

कदमबांडे pudhari.news

धुळे: पुढारी वृत्तसेवा

बूथप्रमुख, पन्नाप्रमुख, वॉरिअर्स तसेच पक्षाने निवडणुकीत आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मतदान व्हावे म्हणून जी काही रचना तयार केली आहे, त्यांना मदतीसंदर्भात आपण सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत. ज्या प्रभागातील बूथमध्ये तुमची नावे असतील तेथे नियुक्त पक्षाच्या सहकाऱ्यांना मदतीसाठी आपण तत्पर राहावे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी घराबाहेर कसे पडतील याची काळजी घ्यायची आहे. गेल्या वेळी मतदानाची टक्केवारी खूप कमी होती, ती वाढविण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचे आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे लोकसभा क्षेत्रप्रमुख राजवर्धन कदमबांडे यांनी आज धुळे येथे केले.

येथील पारोळा रोडवरील राम पॅलेस या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या शहर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकीत कदमबांडे बोलत होते. लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, विनायक शिंदे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, हिरामण गवळी, जयश्री अहिरराव, सुनील वाघ, ओमप्रकाश खंडेलवाल, शिवाजी पवार, साहेबराव देसाई, निरंजन करनकाळ, जगदीश गायकवाड, मोहिनी गौड यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

अंपळकर म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष स्तरावर बूथरचना पूर्ण झाली असून, प्रत्येक बूथवर बूथप्रमुख, पन्नाप्रमुख आदींची नियुक्ती झाली आहे. आपण वरिष्ठ पदाधिकारी अथवा कार्यकर्ता म्हणून आपापल्या भागातील एक, दोन किंवा तीन बूथची जबाबदारी घेऊन त्या-त्या बूथमध्ये नावनोंदणी असलेल्या मतदारांना अधिकाधिक संख्येने मतदानासाठी प्रवृत्त करायचे आहे. जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढून आपल्या उमेदवाराचा विजय सुकर होईल. आपापल्या भागातील बूथची जबाबदारी घेऊन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही अंपळकर यांनी केले.

अग्रवाल म्हणाले, की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. आपल्याला आपल्या भागातून अधिकाधिक मतदार मतदानासाठी घराबाहेर काढायचे आहेत. ज्या बूथमध्ये आपले स्वतःचे नाव आहे त्या बूथवर ६० टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल, असा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरच आपण आपल्या रणनीतीनुसार पक्षाच्या उमेदवाराला ५१ टक्के मतदानाचे उद्दिष्ठ गाठू शकू. गेल्या वेळी धुळे शहरातून खूप कमी मतदान झाले होते. आता राजवर्धन कदमबांडे यांची शक्ती आपल्यासोबत आहे. यामुळे यावेळी ६० टक्क्यांहून अधिक मतदान झालेच पाहिजे. यासाठी आपापल्या भागातील बूथस्तरावर अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्नशील राहायचे आहे. गाफील न राहता आपापला भाग पिंजून काढत आपले उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांची हॅट्रीक साधण्यासाठी सज्ज होऊया, अशी सादही त्यांनी दिली. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, ओमप्रकाश खंडेलवाल, साहेबराव देसाई यांनीही मार्गदर्शन केले.

हेही वाचा:

The post धुळे मतदारसंघातील बूथ रचनेबाबत क्षेत्रप्रमुख कदमबांडे घेतली बैठक appeared first on पुढारी.