
धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत व गजल सम्राट भिमराव पांचाळे यांच्या ‘शब्द सुरांची भावयात्रा’ या कार्यक्रमाने पोलीस कवायत मैदानावरील निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितिनकुमार सिंग, गझलकार भिमराव पांचाळ हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्गंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करुन शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई जिल्हा प्रशासन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची हास्यजत्रा, आयुष्यावर बोलू काही, वारी-सोहळा संतांचा, मोगरा फुलला, शब्द सुरांची भावयात्रा यासह स्थानिक कलाकरांनी आदिवासी नृत्य, शिवकालीन शस्त्र कलेचे सादरीकरण, शहनाई तबला जुगलबंदी, शाहिरी शिवगर्जना, खान्देशी लोककला आणि आहिराणी लोकगीत, मराठी अहिराणी गीतगायन व नृत्य, भरतनाट्यम, काव्यमय संगीत कार्यक्रम, जात्यावरची गाणी, मारुतीची जत्रा बालनाट्य, शाहीरी जलसा, हिंदी मराठी गाण्याची संगीतमय मैफिल, नाटीका, मल्लखांब, जगणं तुमचं आमचं काव्यवाचन व गायन मैफिल, महाराष्ट्र दर्शन, अभंग, महाराष्ट्राची संत परंपरा, लावणी, अहिराणी नृत्य, दिव्यांग विद्यार्थ्याचे कार्यक्रम, बाहुल्यांचे विश्व कटपुतली कार्यक्रम, बेलसर स्वारी नाट्य, कविसंमेलन, अरे संसार संसार हा कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारीत संगीत व नाट्यमय कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमांना धुळेकरांनी पाच ही दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या महासंस्कृती महोत्सवातील शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, बचतगट उत्पादन, वस्त्र संस्कृती दालन, वन्यजीव व छायाचित्र प्रदर्शन, तसेच बचतगट उत्पादनांचे दालनांनाही विद्यार्थ्यांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
समारोप कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी सादर केलेल्या
स्वातंत्र्याच्या अमृत साली, चला पेटवू पुन्हा मशाली ही कविता सादर केली. उपस्थितांनी या कवितेस भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले.
समारोप कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव , उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, संदीप पाटील, मनपा उपायुक्त संगिता नांदुरकर, तहसिलदार अरुण शेवाळे यांच्यासह महसूल, पोलीस, मनपा, जिल्हा परिषदेसह इतर विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
- चारसदस्यीय प्रभाग भाजपला फायदेशीर; महाविकास आघाडीमुळेतुल्यबळ लढती
- Nutrition and Dietetics Career | पोषण- आहारशास्त्रात करिअर करायचंय! जाणून घ्या ‘या’ क्षेत्रातील संधी
The post धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप appeared first on पुढारी.