धुळे पुढारी वृत्तसेवा– सुरत येथील शुकूल ग्रुप ऑफ कंपनीजचे माध्यमातून धुळे जिल्हयातील नागरिकांची सुमारे चार कोटी बहात्तर लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षापासून फरार असलेल्या कंपनीचे मालकास अटक सुरत येथून अटक करण्यात आली आहे दरम्यान या कंपनीकडून फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी तातडीने संपर्क करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
शुकूल ग्रुप ऑफ कंपनीजचे माध्यमातून पैशांची गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा देण्याचे अमिष धुळे जिल्ह्यातील नागरिकांना दाखवण्यात आले. या कंपनीच्या संबंधितांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी कंपनीची जाहिरात करुन नमुद फर्म मध्ये पैसे गुंतविल्यास प्रतिमहिना 8 ते 9 टक्के दराने आकर्षक परतावे मिळतील ,असे आकर्षक व लोभस अमिषे दाखवून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत केले. पिडीत ठेवीदारांकडून गुंतवणूकीची रक्कम स्विकारुन तक्रारदार व इतर पिडीत साक्षीदारांच्या गुंतवणूकीचे परतावे परत न करता ठेवीदारांचे पैशातून 4 ते 5 गुजराती चित्रपट बनवले .ठेवीदारांना वेळोवेळी खोटी माहिती देवून गुंतवणूकदारांचे चार कोटी बहात्तर लाख पन्नास हजार रुपयांचे आर्थिक शोषण केले होते. त्यानुसार दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार झाली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना विद्याधर शुक्ला , धनंजय बराड ,देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल रा. सुरत यांनी पुर्वनियोजीत कट रचुन शुकूल वेल्थ अॅडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाउन्डर, डेलीगेट या फर्मची स्थापना करुन आरोपी मंगेश नारायण पाटील आकाश मंगेश पाटील दोन्ही रा. जयहिंद कॉलनी, दोंडाईचा, यांच्या माध्यमातून ठेवीदारांचे आर्थिक शोषण केले असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली त्यामुळे या सर्व आरोपींच्या विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात भादवि कलम 409, 406, 420, 120 [ब], 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे [वित्तीय संस्थांमधील हित संबंधाचे संरक्षण अधिनियम वर्ष 1999 चे कलम 3 व बक्षीस चिठ्ठी व धन परिसंचरण योजना [निर्बंध] अधिनियम वर्ष 1978 चे कलम 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हयातील मुख्य आरोपी तथा कंपनी मालक प्रदीप विद्याधर शुक्ला हा गुन्हा दाखल दिनांकापासून फरार होता. त्याने सत्र न्यायालय धुळे व उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठ यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज सादर केले होते. त्यावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व . अपर पोलीस अधीक्षक . किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्य होणे बाबतचा विशेष अहवाल सादर करण्यात आला होता.त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता .सदर आरोपीच्या अटकेसाठी धुळे येथील पोलीस पथक वेळोवेळी सुरत येथील पोलीसांचे संपर्कात राहून त्यांचे कडून माहिती काढत होते.अखेर गुन्हयातील सुमारे 2 वर्षापासून फरार असलेला सुरत येथील कंपनीचा मालक तथा गुन्हयातील मुख्य आरोपी प्रदीप उर्फ मुन्ना विद्याधर शुक्ला याला सुरत येथून अटक करण्यात आली.त्यास विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.तसेच धुळे जिल्हयात शुकूल वेल्थ अॅडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाउन्डर, डेलीगेट या कंपन्यामध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली असल्यास संबंधित ठेवीदाराने त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील तपास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
हेही वाचा –