नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील १०७७ धोकेदायक वाडे, घरे, इमारतींच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून, धोकादायक भाग स्वत:हून उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मालक अथवा भाडेकरूंनी महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद न दिल्यास पोलिस बंदोबस्तात धोकादायक वाडे, इमारतींचा भाग उतरविला जाणार असून, खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.
दरवर्षी पावसाळा आला की, महापालिकेला शहरातील धोकादायक जुने वाडे, पडकी घरे, जर्जर झालेल्या इमारतींची आठवण होते. यंदा पावसाळा सुरू होण्याच्या एक महिना अगोदर महापालिकेने या धोकादायक घरांमधील भाडेकरू, मालकांच्या जीवित व वित्तीय मालमत्तेच्या हानीचा विचार करत पूर्वसूचना दिली आहे. शहरात बहुतांश धोकादायक वाडे जुने नाशिक व पंचवटी भागात आहेत. सदर वाडे जुनाट झाल्याने मोडकळीस आले आहेत. पावसाळ्यात दरवर्षी जुने वाडे, घरे, पडक्या इमारतींचा भाग कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सहा विभागीय कार्यालयांच्यामार्फत धोकेदायक वाडे खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु, एकदा नोटीस बजावल्यानंतर त्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. जुने नाशिक, पंचवटीसारख्या भागात मालक-भाडेकरू वाद असलेल्या अनेक धोकेदायक इमारती आहेत. आपला दावा जाण्याच्या भीतीने भाडेकरू जागा खाली करत नाहीत. धोकेदायक जागेत जीव मुठीत धरून राहतात. अशा इमारती, वाडे कोसळल्यास जीवित व वित्त हानी होते. त्यामुळे असे जुने वाडे, पडकी घरे, इमारती नागरिकांनी स्वत:हून उतरवून घ्याव्यात, अन्यथा महापालिका पोलिस बंदोबस्तात कारवाई करेल, असा इशारा नोटिसींद्वारे देण्यात आला आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटचे बंधन
३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या सर्व इमारती, वाडे, घरांना सरंचनात्मक परीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज, सिव्हिल टेक, संदीप पॉलिटेक्निक या संस्थांची निवड करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्या इमारतींना २५ हजार रुपये दंड किंवा मालमत्ता कराएवढी रकमेचा दंड भरावा लागणार आहे.
विभाग – धोकेदायक घरे, वाडे
पश्चिम- ६००
पंचवटी- १९८
पूर्व- ११७
नाशिक रोड- ६९
सातपूर- ६८
सिडको- २५
एकूण- १०७७
हेही वाचा: