नाशिक (सिन्नर, नांदूर शिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
संगमनेर तालुक्यातील निमोन गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले मृतामधील दोघे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील तर एक जण अकोले तालुक्यातील गर्दनी येथील रहिवासी आहे.
नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात शनिवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास झाला. कंटेनर व पल्सर मोटरसायकल यांच्यात अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली. सदरचा अपघात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे अपघात स्थळी पोचून सदरचा कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा केला.
अपघातामध्ये मृत झालेल्या मध्ये नांदुर-शिंगोटे येथील आदिवासी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३०) व युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९) व संदीप सोमनाथ अगविले (रा. गर्दनी ता. अकोले) यांचा समावेश आहे. तिघे मोटरसायकलने जात असताना कंटेनर (क्रमांक जी जे १५ ए व्ही ६६५६) व पल्सर मोटरसायकल (क्रमांक एम एच १५ एच के ५३०४) यांचा अपघात झाला. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्यामुळे मोटरसायकल वरील तिघेही गतप्राण झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे येथील आदिवासी बांधवांनी निमोन गावाकडे धाव घेतली. सदरचा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये तिघेही तरुण जागीच ठार झाले. रविवारी (दि.२१) सकाळी नांदूर शिंगोटे येथे दोघांवर व एकावर गर्दनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघेही तरुण यामध्ये ठार झाल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कायमचेच अपघात घडत असतात सदरचा रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अनेक दिवसाची मागणी असूनही याकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक तरुणांना लहान-मोठे अपघातांमधून आपले प्राण गमावण्याची वेळ येत आहे. तेव्हा त्वरित हा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.
हेही वाचा: