नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी, निवडणूकीचा फिव्हर तसुभरही कमी झाला नाही. उलट मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा आकडेमोडीला वेग येत आहे. सध्या नाशिकमध्ये पारावर, कट्यावर अन् सोशल मीडियावर ‘कोण किती लीड घेणार’ ही एकच चर्चा रंगत आहे. ही चर्चा कधी मविआचे राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने तर कधी महायुतीचे खासदार हेमंत गोडसे यांच्या बाजूने झुकत असल्याने, उमेदवारांची मात्र पूर्ती झोप उडाली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात निकालाबाबत प्रचंड अनिश्चितता असल्याने, जो-तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आकडेमोड करीत आहे. त्यात सोशल मीडियाची भर पडत असून, व्हायरल होत असलेल्या मेसेजवरून या चर्चांना आणखीनच उधान येत आहे. सध्या नागरिकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन गट पडले असून, अधुन-मधुन वंचित आणि जय बाबाजी भक्त परिवाराचा गटही चर्चेत उडी घेत आहे. प्रत्येकाकडून आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला जात असल्याने, या चर्चा थांबता थांंबत नसल्याचे चित्र आहे. काही उत्साही कार्यकर्ते तर थेट उमेदवारालाच फोन करून ‘साहेब तुम्हीच लीड घेणार’ असे सांगत आहेत. त्यातच गेल्या पंचवार्षिक निवडणूकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने, वाढीव मतदार आमच्याच उमेदवाराच्या पथ्यावर पडल्याचा दावाही केला जात असल्याने सध्या नाशिकचे राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियावर निकाल जाहीर
सोशल मीडियावर कधी, काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. सध्या असाच एक निकालाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांना कोणत्या विधानसभा मतदार संघात किती मते मिळाली याचे आकडे दर्शविले आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय झालेल्या मतदानावरून हा अंदाज वर्तविला जात असून, त्यात मविआच्या बाजूने निकाल दर्शविण्यात आल्याने मविआत खुशी तर महायुतीत टेन्शन निर्माण करणारा हा मेसेज ठरत आहे.
मिम्सचा पाऊस
नागरिकांमध्ये सुरू असलेल्या आकडेमोडीवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियावरील एका मजेशीर संदेशात चक्क निवडणूक आयोगालाच विनंती केली आहे. ‘नाशिक लोकसभा मतदार संघाचा निकाल त्वरीत घोषित करा. कारण आमच्या भागातील लोक रोज आकडेमोड करीत असल्याने गणितज्ज्ञ होण्याच्या मार्गावर आहेत.’ तर दुसऱ्या एका संदेशात ‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन’ असे म्हणत भावना आवरण्याचे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा –