नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले

सिडको www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर लाइव्ह करत शिवीगाळ केल्याच्या राग मनात धरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाच्या डोक्यात पेव्हरब्लॉक मारून खून केल्याची घटना सिडकोतील सावतानगर या ठिकाणी रात्री ९ च्या सुमारास घडली. परशुराम बाळासाहेब नजान (वय २४, रा. पाथर्डी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आठ विधिसंघर्षीत बालकांसह तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी न्यायालयात उभे केले असता त्यांना ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत परशुराम नजान व त्याचे तीन साथीदार सावतानगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी गिल्या ऊर्फ वैभव शिर्के (वय २२) रा. कामटवाडा हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. त्यातील एकाने सोशल मीडियावर लाइव्ह असताना गिल्या ऊर्फ वैभव शिर्के यास शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरत वैभव याने एका अल्पवयीनासोबत वाद घालून त्यास मारहाण केली. त्यावेळी परशुराम याने मध्यस्थी करून मारहाण करत असलेल्या टोळक्याला तिथून काढून दिले होते. संशयित शिर्केचे साथीदार परत जात असताना यातील एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्याच्या पाठीत कोयता मारला, त्याचा राग येऊन संशयित आरोपी शिर्के व त्याचे साथीदार, अमोल बापू पाटील (२३ रा. कामटवाडा), ओंकार दिलीप बागूल (१८, रा. कामटवाडा) यांनी त्याच्या आठ अल्पवयीन साथीदारांसोबत परशुराम याला मारहाण करत त्याच्या डोक्यात पेव्हरब्लॉक मारून गंभीर जखमी केले. यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परशुराम नजान याच्यावर पाथर्डी गाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, किशोर कोल्हे, संदीप पवार, उत्तम सोनवणे, किरण शेवाळे, सुनील बिडकर, नाईद शेख आदींचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवीत काही तासातच संशयितांना जेरबंद केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तीनही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहेत.

भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात हल्ला अन् खून
परशुराम बाळासाहेब नजान हा रात्री ८.३० च्या सुमारास सावतानगर येथे आला होता. घरी जायला उशीर झाल्याने सावतानगर येथील मेसमध्ये जेवायला गेला. त्याचवेळी संशयित आरोपी त्याच्या शेजारी येऊन जेवायला बसला. थोड्या वेळाने इतर युवक आले व त्यांनी नजान याच्या शेजारी बसलेल्या संशयितास मारायला सुरुवात केली. त्यांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात नजानवर हल्ला होऊन त्याचा खून झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले appeared first on पुढारी.