नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे कोट्यधीश, इतकी आहे संपत्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांनी सोमवारी (दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी जाेडलेल्या शपथपत्रात एकूण १४ कोटी ८० लाख ४९ हजार १९१ रुपयांंची मालमत्ता दाखविली आहे. त्यांच्यावर १९ लाखांचे कर्ज असून विशेष म्हणजे नावावर एकही गुन्हा दाखल नाही. (Rajabhau Waje)

राजाभाऊ वाजे यांचे शिक्षण सिन्नरमधून झाले असून ते वाणिज्य शाखेतून पदवीधर आहेत. त्यांच्या नावावर १३ कोटी २७ लाख ९१ हजार ३० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यातील बहुतांश मालमत्ता वारसा हक्काने त्यांना मिळालेली आहे. तर एक कोटी ५२ लाख ५८ हजार १५५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. (Rajabhau Waje)

सिन्नरमध्ये वाजे यांचा पेट्रोलपंप असून तालुक्यातील डुबरे, सदरवाडी, सिन्नर येथे शेतजमिनी आहेत. तसेच सिन्नर शहरात वाणिज्य इमारत व गाळे आहेत. डुबेरे येथे निवासी जागा आहे. याशिवाय नवी मुंबई येथील खारघरमधील मातोश्री सहकारी गृहनिर्माण संस्थेत ३५ लाख रुपये किंमतीचा भूखंड आहे. त्यांच्या नावे जिल्हा बँक, नामको बँक व लोकनेते पतसंस्था यांचे शेअर्स असून विमा पॉलिसी देखील आहेत. वाजेंनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून १० लाखांचे पीककर्ज घेतले आहे. तर लोकनेते पतसंस्थेचे नऊ लाख ८१ हजार ८६५ रुपयांचे वाहन कर्ज आहे. (Rajabhau Waje)

वाजेंकडे सात वाहने

वाजे यांच्या स्वत:कडे ७० हजारांची, तर पत्नी दीप्ती वाजे यांच्याकडे २१ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तसेच त्यांच्याकडे आठ ग्रॅम साेने असून त्याचे बाजारमूल्य ५७ हजार ६०० रुपये आहे. तर पत्नीच्या नावे २२५ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने आहेत. त्याचे मूल्य १६ लाख २० हजार इतके आहे. वाजे यांच्या नावे सात वाहने आहेत. त्यामध्ये तीन कार, दोन दुचाकी व एक ट्रॅक्टर ट्रॉलीचा समावेश आहे.

हेही वाचा –